आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जाहीर केलेले ‘जीएसटी जनरेशन २.०’ आजपासून लागू होतआहे. अंमलबजावणीच्या पूर्वसंध्येला रविवारी त्यांनी देशाला संबोधित करून ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होणार असून त्याचा लाभ सर्वांना मिळेल, तसेच नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा, असे आवाहन केले.
आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार
Published on

नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जीएसटी जनरेशन २.०’ची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू होणार आहे. ‘जीएसटी २.०’च्या अंमलबजावणीच्या पूर्वसंध्येला रविवारी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. ‘सोमवारपासून देशात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होणार असून त्याचा फायदा सर्वांना होईल. तसेच नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

२० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी जीएसटी सुधारणा, आत्मनिर्भर भारत व स्वदेशीवर भर दिला. स्वदेशी मोहिमेबरोबरच उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारना केले. गुंतवणुकीसाठी सुयोग्य परिस्थिती बनवावी. केंद्र व राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेतल्यास देशाच्या प्रगतीचे स्वप्न साकार होईल, असेही मोदी म्हणाले.

ते म्हणाले की, देश नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘स्वावलंबी भारत’ मोहिमेसाठी मोठे पाऊल उचलत आहे. २२ सप्टेंबरच्या सूर्योदयाबरोबरच ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी’ लागू केले जाईल. यामुळे देशात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होणार आहे. त्यामुळे तुमची बचत वाढणार असून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकता, असे त्यांनी सांगितले.

एक देश-एक कर

२०१४ मध्ये देशाने मला पंतप्रधान बनवले. तेव्हा लाखो कंपन्या वेगवेगळ्या करांमुळे त्रासलेल्या होत्या. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासात खर्च वाढत होता. या जंजाळातून देशाला बाहेर काढणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही ‘जीएसटी’ लागू करण्यासाठी प्राधान्य दिले. आम्ही सर्व भागधारक व राज्यांशी चर्चा करून तोडगा काढला. त्यातून ‘एक देश-एक कर’ अस्तित्वात आला, असे मोदी म्हणाले.

गरीब, मध्यमवर्गीयांना दिलासा

गेल्या ११ वर्षात २५ कोटी जणांनी गरिबीवर मात केली आहे. गरीबीतून बाहेर आलेले लोक आता निम्न मध्यमवर्गीय म्हणून जगत आहेत. यंदा सरकारने १२ लाख रुपये प्राप्तिकर माफी दिली. त्यामुळे तुम्ही विचार करा, मध्यमवर्गीयांच्या जीवनात किती बदल झाला आहे. जीएसटी कमी झाल्याने घरबांधणी, टीव्ही, फ्रीज, दुचाकी, स्कूटरसाठी कमी खर्च लागेल, असे त्यांनी सांगितले.

स्वावलंबी बनणे गरजेचे

‘विकसित व स्वावलंबी’ भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एमएसएमई क्षेत्रावर मोठी जबाबदारी आहे. ही देशाच्या जनतेची गरज आहे. ज्या वस्तू आपण देशात बनवू शकतो, त्या येथेच बनवल्या पाहिजेत. जीएसटी दर कमी झाल्याने व नियम आणि प्रक्रिया सोपी केल्याने एमएसएमईला मोठा फायदा होईल. त्यांची विक्री वाढेल व कर कमी द्यावा लागेल. त्यामुळे त्यांना दुप्पट फायदा होईल. भारत जेव्हा प्रगतीच्या शिखरावर होता, तेव्हा त्याचा आधार एमएसएमई होते. भारतात त्या काळी बनणाऱ्या वस्तूंचा दर्जा चांगला होता. आता ते दिवस आपल्याला पुन्हा आणायचे आहेत. भारताच्या वस्तू जगात सर्वोत्कृष्ट असल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

सर्व राज्यांनी स्वदेशीबरोबरच उत्पादन क्षेत्राला गती दिली पाहिजे. गुंतवणुकीसाठी अनुकूल परिस्थिती बनवायला हवी. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला स्वदेशी मंत्राने ताकद मिळाली. आता देशाची समृद्धी स्वदेशीतून निर्माण होईल, असे मोदी म्हणाले.

गर्व से कहो ये स्वदेशी है

दैनंदिन जीवनातील परदेशी वस्तूंपासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. त्यामुळे भारतात बनलेल्या वस्तू खरेदी करायला हव्यात. प्रत्येक दुकान हे स्वदेशीने सजवायचे आहे. ‘अभिमानाने सांगा, मी स्वदेशी वस्तू वापरतो आणि विकतो.’ हे प्रत्येक भारतीयाने ठामपणे सांगितले पाहिजे, असे ते म्हणाले.

२.५ लाख कोटींची बचत होणार

जीएसटीतील बदलामुळे दुकानदार खुशीत आहेत. आता ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्राप्तिकर व जीएसटी सवलत पाहता देशातील जनतेची २.५ लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे, असे मोदी म्हणाले.

हा स्वत:कडे श्रेय घेण्याचा प्रयत्न - खर्गे

‘जीएसटी’तील दुरुस्तीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:कडे घेत आहेत. ‘जीएसटी’तील सध्याच्या सुधारणा अपुऱ्या असून राज्यांची नुकसानभरपाईची मागणी मान्य केलेली नाही. जनतेला खोल जखमा करून त्यावर बँडेज‌ लावण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. गेल्या ८ वर्षांत तुम्ही जनतेकडून ५५ लाख कोटी रुपये उकळले. आता २.५ लाख कोटींच्या बचतीच्या गप्पा करता? असा टोलाही खर्गे यांनी लगावला.

‘जीएसटी’चे आता तीन टप्पे

‘जीएसटी’चे यापूर्वीचे पाच टप्पे रद्द करण्यात आले आहेत. आता ‘जीएसटी’चे फक्त ५, १८ व ४० टक्के हे तीन टप्पे राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in