
नवी दिल्ली : केंद्र सरकार आता वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करून मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलासा देण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार ‘जीएसटी’च्या स्लॅबमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे. १२ टक्क्यांचा ‘जीएसटी स्लॅब’ हटवण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याचे समजते. त्यामुळे टूथपेस्ट, कपडे, बूट, भांडी, नॅपकिन, वह्या, मोबाईल यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या ०, ५, १२, १८ आणि २८ टक्के असे जीएसटीचे पाच स्लॅब आहेत. यामधील १२ टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे रद्द होऊ शकतो किंवा सध्या १२ टक्के कर आकारणाऱ्या वस्तू ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येऊ शकतात. केंद्र सरकारने हा बदल केल्यास, दररोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत. टूथपेस्ट, केसांना लावण्यात येणारे तेल ते चप्पल, स्टेशनरी वस्तू अन् लस्सी यांसारख्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
१२ टक्क्यांचा स्लॅब कमी केला अथवा काही वस्तू ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणल्यास, केंद्र सरकारला ४० हजार ते ५० हजार कोटींचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. ‘जीएसटी’मुळे वस्तू स्वस्त झाल्यास विक्रीमध्ये वाढ होईल अन् ‘जीएसटी’ संकलन मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज बांधला जातोय. कमी किमतीमुळे विक्री वाढेल, ज्यामुळे कराचा आधार वाढेल आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून ‘जीएसटी’ संकलनात वाढ होईल. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘जीएसटी’ दरांमध्ये संभाव्य बदलांचे संकेत दिले होते.
उपकरामुळे काही वस्तू महागण्याची शक्यता
सिगारेट, शीतपेये, आलिशान कार आणि कोळसा यांसारख्या वस्तूंवर आरोग्य उपकर आणि स्वच्छ ऊर्जा उपकर लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे काही वस्तू महागण्याचीही शक्यता आहे. तंबाखू उत्पादने, सिगारेट आणि साखरयुक्त पेये यांसारख्या वस्तू आधीच २८ टक्क्यांच्या कर स्लॅबमध्ये येतात. आता या वस्तूंपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी आणि सरकारला अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी त्यांच्यावर अतिरिक्त आरोग्य उपकर लावण्याची योजना आहे.
या वस्तू स्वस्त होणार?
टूथपेस्ट, सॅनिटरी नॅपकिन, केसांचे तेल, साबण, छत्र्या, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, वॉटर फिल्टर आणि प्युरिफायर, ॲॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी, वॉशिंग मशीन, सायकल, रेडिमेड कपडे, बूट, लस्सी, लोणी, तूप, वह्या, मोबाईल, पॅकेज्ड खाद्यपदार्थ इ.