
मुंबई : राज्यात ‘गुइनेल बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही ‘जीबीएस’ने थैमान घातले आहे. ‘जीबीएस’मुळे १० आणि १७ वर्षीय अशा दोन मुलांचा कोलकातामध्ये मृत्यू झाला झाल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षीय मुलाला कोलकाता येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रविवारी त्याचा मृत्यू झाला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील या मुलावर बीसी रॉय रुग्णालयात आठवडाभर उपचार सुरू होते.
‘जीबीएस’मुळे महाराष्ट्रात आणखी एक मृत्यू
राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात ५६ वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्यापासून राज्यातील हा दुसरा रुग्ण मृत्यू ठरला आहे.
मंगला उमाजी चव्हाण (वय ५६) असे जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या सिंहगड रस्त्यावरील नांदोशी येथील रहिवासी होत्या. त्यांना १५ जानेवारीला अशक्तपणा आणि अर्धांगवायूची लक्षणे जाणवू लागली. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा प्रकृती बिघडल्याने त्यांना १७ जानेवारीला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससूनमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा २८ जानेवारीला मृत्यू झाला. श्वसनक्रिया थांबण्यासह अर्धांगवायूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.