अहमदाबाद : काँग्रेसचे गुजरातमधील कार्याध्यक्ष अंबरीश डेर यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा दिला असून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
डेर यांच्या घोषणेच्या आधी गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी पत्रकारांना सांगितले की, रविवारी रात्री झालेल्या बैठकीत पक्षाच्या शिस्तपालन समितीने डेर यांना पक्षाच्या सर्व पदांवरून आणि काँग्रेसचे प्राथमिक सदस्य म्हणून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. गोहिल यांनी काँग्रेसच्या कारवाईची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच डेर यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली आणि सांगितले की, काँग्रेसने मला कधी निलंबित केले हे मला माहीत नाही. पण, मी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे आणि तो फॅक्स आणि ईमेलद्वारे आमच्या उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. मी मंगळवारी गांधीनगरमधील 'कमलम' या राज्य मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराला भेट न देण्याचा पक्ष नेत्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस सोडत असल्याचे डेर यांनी पत्रकारांना सांगितले.
डेर यांनी २०१७ ते २०२२ पर्यंत अमरेली जिल्ह्यातील राजूला मतदारसंघाचे काँग्रेस आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. डेर हे पूर्वी भाजपमध्येच होते. त्यामुळे त्यांची ही घरवापसी ठरणार आहे.