टँकर लटकला...गुजरातमधील ब्रिज अचानक मधोमध तुटला; अनेक गाड्या थेट नदीत, ९ मृत्युमुखी; ८ जणांना वाचवण्यात यश

आणंद आणि बडोदाला जोडणारा पुल सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक मधोमध तुटला. त्यावेळी पुलावरून जाणारी काही वाहने थेट महिसागर नदीत पडली.
टँकर लटकला...गुजरातमधील ब्रिज अचानक मधोमध तुटला; अनेक गाड्या थेट नदीत, ९ मृत्युमुखी; ८ जणांना वाचवण्यात यश
Published on

गुजरातच्या बडोदा येथील महिसागर नदीवरील ब्रिज बुधवारी सकाळी अचानक तुटल्याने भीषण दुर्घटना झाली आहे. घटनेवेळी काही वाहनं पुलावरून जात होती. जेव्हा पूल तुटला तेव्हा पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा नदीत पडली. तर, एक टँकर तुटलेल्या पुलावर कसाबसा अडकून लटकला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आणंद आणि बडोदाला जोडणारा पुल सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक मधोमध तुटला. त्यावेळी पुलावरून जाणारी काही वाहने थेट महिसागर नदीत पडली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने ८ जणांना वाचवण्यात यश आलंय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा ४५ वर्षे जुना पूल मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा वाहतूक संपर्क होता.

या घटनेनंतर लगेचच स्थानिकांनी मोठी गर्दी केली. हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होता. या पुलाची मोडकळीस आलेली अवस्था वारंवार निदर्शनास आणून दिली होती आणि तातडीने दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्याची मागणी केली होती, मात्र इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आज हा मोठा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

'गुजरात मॉडल'च्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल

काँग्रेसने या भीषण दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत ही घटना 'गुजरात मॉडल'च्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल आहे, अशी टीका राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, पुल कोसळल्यामुळे आणंद, बडोदा, भरुच आणि अंकलेश्वर या प्रमुख जिल्ह्यांचा सौराष्ट्राशी संपर्क तुटला असून प्रादेशिक वाहतूक आणि व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in