पत्नीच्या भटक्या कुत्र्यांवरील प्रेमामुळे लैंगिक समस्या उद्भवल्या; पतीची हायकोर्टात तक्रार, घटस्फोटाची मागणी

आपल्या पत्नीचे भटक्या कुत्र्यांवर अतोनात प्रेम आहे, मात्र त्यामुळे लैंगिक समस्या उद्भवल्या, अशी तक्रार करीत एका पीडित पतीने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली असून घटस्फोटाची मागणी केली आहे.
पत्नीच्या भटक्या कुत्र्यांवरील प्रेमामुळे लैंगिक समस्या उद्भवल्या; पतीची हायकोर्टात तक्रार, घटस्फोटाची मागणी
Published on

नवी दिल्ली : आपल्या पत्नीचे भटक्या कुत्र्यांवर अतोनात प्रेम आहे, मात्र त्यामुळे लैंगिक समस्या उद्भवल्या, अशी तक्रार करीत एका पीडित पतीने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली असून घटस्फोटाची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याप्रकरणी १ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

पतीने घटस्फोटानंतर पत्नीला १५ लाख रुपये पोटगी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर पत्नीने २ कोटी रुपयांचा आग्रह धरला आहे. एका ४१ वर्षीय पुरूषाने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत क्रूरतेच्या आधारावर आपल्या पत्नीपासून घटस्फोट मागितला आहे. या व्यक्तीने असा आरोप केला आहे की, पत्नीने भटक्या कुत्र्यांना त्यांच्या घरात आणल्यामुळे त्याला त्रास झाला आहे. याचबरोबर त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याबद्दल पत्नीने केलेल्या एका प्रँक फोन कॉलमुळे त्याचा सर्वांसमोर अपमान झाला आहे.

तणाव सुरू झाला

पतीच्या याचिकेनुसार, या जोडप्याचे २००६ मध्ये लग्न झाले आहे. त्याच्या पत्नीने सोसायटीमध्ये पाळीव प्राण्यांना आणण्यास बंदी असूनही त्यांच्या घरात एक भटका कुत्रा आणला, ज्यामुळे त्यांच्यातील तणाव सुरू झाला. त्यानंतर पत्नीने फ्लॅटमध्ये आणखी भटके कुत्रे आणले. या कुत्र्यांसाठी त्याला अन्न बनवायला लावले आणि त्यांची स्वच्छताही करायला लावली. पतीने पुढे सांगितले की, जेव्हा त्याने एका कुत्र्याला त्यांच्या बेडवर झोपण्यासाठी विरोध केला, तेव्हा कुत्र्याने त्याला चावा घेतला.

शिवीगाळ, अपमान

पतीने या याचिकेत पुढे म्हटले आहे की, घरात कुत्रे आणल्यामुळे शेजारी त्याच्या विरोधात गेले. यामुळे २००८ मध्ये शेजाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. आपली पत्नी प्राणी हक्क संघटनेत सहभागी झाल्यानंतर तिने वारंवार इतरांविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल केल्या. तिला मदत करण्यासाठी त्याला ठाण्यात बोलावले असता, ठाण्यात जाण्यास त्याने नकार दिला. यामुळे पत्नीने त्याला शिवीगाळ आणि अपमानित केले.

लैंगिक आरोग्य बिघडले

पतीने असा दावा केला आहे की, या तणावामुळे त्याचे लैंगिक आरोग्य बिघडले आणि त्याच्या लैंगिक शक्तीवर परिणाम झाला. त्याने असा आरोप केला की, १ एप्रिल २००७ रोजी त्याच्या पत्नीने त्याच्या कथित प्रेमसंबंधाबद्दल एका रेडिओ जॉकीकडून प्रँक कॉल करण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे त्याची नोकरीच्या ठिकाणी आणि समाजात बदनामी झाली. पत्नीला कंटाळून आपण बंगळुरूला निघून गेलो, तरीही त्याची पत्नी त्याचा छळ करत राहिली, असेही याचिकेत म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in