

सुरेंद्र नगर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुजरातच्या सुरेंद्र नगर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना १५०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी एका नायब तहसीलदाराला यापूर्वीच अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीची तीन पथके आयएएस अधिकारी राजेंद्र पटेल यांच्या घरी दाखल झाली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
यापूर्वीही ईडीच्या पथकाने त्यांच्या घराची तपासणी केली होती. त्यांचे पीए जयराज सिंह झाला, नायब तहसीलदार चंद्रसिंह मोरी आणि कारकून मयुर सिंह गोहिल यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली होती. नायब तहसीलदार चंद्र सिंह मोरी यांच्या घरातून ६० लाख रुपये रोख जप्त करून त्यांना अटक करण्यात आली होती. ही रक्कम लाच म्हणून घेतल्याची कबुली मोरीने दिली होती.
गुजरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यात आयएएस पटेल, नायब तहसीलदार चंद्र सिंह मोरी, पीए जयराज सिंह झाला आणि कारकून मयुर सिंह गोहिल यांना आरोपी बनवले आहे.