
गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपने अवघ्या तीन वर्षांत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा अपवाद वगळता संपूर्ण मंत्रिमंडळ बदलले आहे. गुरुवारी १६ मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर शुक्रवारी २६ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळात १९ नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्रीपदी बढती देण्यात आली आहे, तर क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा यांच्या पत्नी रिवाबा जाडेजाही मंत्री झाल्या आहेत.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सर्व मंत्री व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
गुजरात सरकारमधील मोठा फेरबदल हा गुजरातच्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी मानली जात आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. तत्पूर्वी, हा बदल करण्यात आला आहे.
नवीन मंत्रिमंडळाच्या रचनेत जातीय समीकरणावर भर देण्यात आला. ८ ओबीसी, ३ अनुसूचित जाती, ४ अनुसूचित जमाती आणि ३ महिला आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांसोबत ८ मंत्री पटेल समाजातील आहेत. या फेरबदलानंतर मंत्रिपरिषदेची संख्या १७ वरून वाढून २६ झाली आहे.
सुरतच्या माजुरा मतदारसंघाचे आमदार हर्ष संघवी, जे यापूर्वी गृह राज्यमंत्री होते, त्यांना उपमुख्यमंत्रीपदी बढती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पटेल यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच राज्यात उपमुख्यमंत्रीपद नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी हे पद २०२१ पर्यंत माजी मुख्यमंत्री दिवंगत विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये नितीन पटेल यांच्याकडे होते.
संघवीसह सहा आमदारांना जे गुरुवारपर्यंत पटेल सरकारमध्ये मंत्री होते, त्यांना नव्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. गुरुवारी १६ मंत्र्यांनी राजीनामे दिले असले, तरी या सहा मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले नव्हते. जीतू वाघाणी, अर्जुन मोढवाडिया आणि मनीषा वकील यांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.
पोरबंदर मतदारसंघाचे आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ते यापूर्वी गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहिले असून, मार्च २०२४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
रिवाबा जाडेजा यांचा मंत्रिमंडळात प्रवेशही अनेकांसाठी आश्चर्याचा ठरला. त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या पती रवींद्र जाडेजा आणि मुलगी यांनी शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली.
आताच्या २५ सदस्यांच्या मंत्रिपरिषदेत ९ कॅबिनेट मंत्री, ३ स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री आणि १३ राज्यमंत्री आहेत. फेरबदलात मुख्यमंत्र्यांनी १० मंत्र्यांना वगळले असून, यात उद्योग मंत्री बलवंतसिंह राजपूत, कृषी मंत्री राघवजी पटेल, समाज न्याय मंत्री भानूबेन बाबरिया आणि वन व पर्यावरण मंत्री मुलु बेरा यांचा समावेश आहे.
नव्या मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधित्व वाढले असून, आता तीन महिला मंत्री आहेत, तर यापूर्वी केवळ एकच महिला मंत्री होती. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांची राज्य भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणामुळे त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले नाही, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
गुजरातचे नवे मंत्रिमंडळ
भूपेंद्र पटेल (मुख्यमंत्री), त्रिकम बीजल चांगा, स्वरूपजी ठाकोर, प्रत्रवणकुमार गोर्धनजी माली, ऋतिकेश गणेशभाई पटेल, पी. सी. बराडा, दर्शना एम. वाघेला, कांतीलाल शिवलाल अमृतिया, वरजीभाई बावलिया, रिवाबा जाडेजा, अर्जुन मोढवाडिया, डॉ. प्रद्युम्न वाजा, कौशिक कांतीभाई वेकरिया, परषोत्तमभाई सोलंकी, जितेंद्रभाई सवजीभाई वाघाणी, रमणभाई भीखाभाई सोलंकी, कमलेशभाई पटेल, संजयसिंह महेदा, रमेशभाई कटारा, मनीषा वकील, ईश्वरसिंह पटेल, प्रफुल पानसेरिया, हर्ष संघवी (उपमुख्यमंत्री), जयारामभाई गामित, नरेशभाई पटेल, कनुभाई देसाई.