गुजरात दंगल : सुप्रीम कोर्टाची पंतप्रधान मोदींना क्लीनचिट

गुजरातमधील अहमदाबाद येथे दंगल झाली होती. या दंगलीत एहसान जाफरींसह ६९ जणांची हत्या करण्यात आली होती
गुजरात दंगल : सुप्रीम कोर्टाची पंतप्रधान मोदींना क्लीनचिट
ANI

२००२ साली झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीनचिट दिली. यापूर्वी एसआयटीनेही पंतप्रधान मोदींसह इतर ६४ लोकांना क्लीनचिट दिली होती. याविरोधात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत पंतप्रधान मोदींना क्लीनचिट दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गेल्यावर्षी ९ डिसेंबर रोजी याबाबत सुनावणी घेण्यात आली होती. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर एसटीआयच्या अहवालावर शिक्कामोर्तब करत शुक्रवारी न्यायालयाने झाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका योग्य नसल्याचे सांगत फेटाळून लावली.

दंगलीत ६९ जणांची हत्या

२८ फेब्रुवारी २००२ साली गुजरातमधील अहमदाबाद येथे दंगल झाली होती. या दंगलीत एहसान जाफरींसह ६९ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. तपासानंतर एसआयटीने नरेंद्र मोदींसह ६४ जणांना क्लीनचिट दिली होती. एसआयटीच्या या अहवालाविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झाकिया यांची बाजू न्यायालयात मांडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in