महाराष्ट्रात गुंडाराज; खर्गे यांचा आरोप

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आणि गुंडाराज पसरवला जात असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्रात गुंडाराज; खर्गे यांचा आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शनिवारी घडलेल्या घटनांवरून भाजपवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार हल्लाबोल केला. यात महाराष्ट्रात नुकतीच फेसबुक लाईव्ह दरम्यान एका शिवसेना नेत्याची अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून झालेली हत्या आणि निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेला हल्ला याचा संदर्भ देत खर्गे यांनी महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आणि गुंडाराज पसरवला जात असल्याचा आरोप केला.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी २ फेब्रुवारी रोजी मुंबईजवळील उल्हासनगर येथे जमिनीच्या वादातून आणि राजकीय वैमनस्यातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यावर गोळ्या झाडून जखमी केले होते.

एक्सवरील हिंदीतील एका पोस्टमध्ये, खर्गे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. भाजपने जनादेश चोरला आहे. तेथे फेसबुक लाईव्हवर एका राजकारण्याची निर्घृण हत्या केली जाते. भाजप-आरएसएसच्या बेलगाम गुंडांकडून एका स्पष्टवक्त्या पत्रकारावर हल्ला केला जात आहे, तर भाजपचा एक आमदार पोलीस ठाण्यात उघडपणे दुसऱ्या राजकारण्यावर गोळ्या झाडत आहे.

खर्गे म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखली आणि तरच राज्याचा आर्थिक विकास शक्य झाला. पण सक्त अंमलबजावणी संचालनालयाच्या बळावर स्थापन झालेले भाजप सरकार 'गुंडाराज' पसरवून महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेशी खेळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in