ज्ञानवापीप्रकरणी सर्व्हे अहवाल जाहीर

ज्ञानवापीप्रकरणी सर्व्हे अहवाल जाहीर
Published on

वारणासीतील ज्ञानवापी मशिदीच्या तीन दिवसांच्या सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी दिवाणी न्यायालयात सादर करण्यात आला. विशेष वकील आयुक्त विशाल सिंह यांनी १४, १५ आणि १६ मे रोजी झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला. दरम्यान, ज्ञानवापीप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू आणि मुस्लीम पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाराणसीच्या दिवाणी न्यायालयासाठी एक आदेश जारी केला. त्यानुसार, शुक्रवारपर्यंत कनिष्ठ न्यायालयाने कोणताही आदेश देऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे.

ज्ञानवापीप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू-मुस्लीम बाजूंचा पाच मिनिटे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आदेश दिला की, वाराणसी न्यायालयाने याप्रकरणी कोणताही निर्णय देऊ नये. सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करेल. वाराणसी न्यायालयात याप्रकरणी दररोज सुनावणी होत असून नवीन निर्णय दिले जात आहेत, असे मुस्लीम पक्षाच्यावतीने सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आम्ही कडक निर्देश देत आहोत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह यांच्या खंडपीठात सकाळी सुनावणी सुरू झाली. ही सुनावणी पाच मिनिटे चालली. ‘आम्ही अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही, त्यामुळे आणखी वेळ द्यावा’, असे हिंदू पक्षाने न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मुस्लीम पक्षाने प्रार्थनास्थळ १९९१ कायद्यासाठी युक्तिवाद करत याचिका दाखल केली आहे आणि सर्वेक्षणाच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

ज्ञानव्यापी सर्व्हेत मंदिराचे

अवशेष, भिंतीवर शेषनाग?

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हे अहवालात ज्ञानवापी परिसरात पश्चिमेकडे असेलल्या भिंतीवर प्राचीन मंदिरांचा मलबा सापडला असून त्यात देवी- देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. कोर्टाकडून हटवण्यात आलेले कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी हा दावा केला आहे. अजय मिश्रा यांनी तयार केलेल्या अहवालात ज्ञानवापी परिसरात उत्तरेहून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गावरील भिंतीवर शेषनाग व नागफणीसारख्या आकृती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in