वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात गुरुवारी ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. मात्र, कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय पुढील सुनावणीपर्यंत राखून ठेवला आहे. आता पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार असल्याने या प्रकरणाचा निर्णय त्याच दिवशी लागण्याची शक्यता आहे.
भगवान आदि विश्वेश्वर विराजमान या प्रकरणावर सुनावणी व्हावी की नाही, यावर निर्णय होणार आहे. वाराणसीचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग महेंद्र पांडे यांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. १५ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील हिंदू बाजूची चर्चा पूर्ण झाली. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी न्यायाधीश वरिष्ठ विभागाने निकालाची तारीख निश्चित केली होती. मात्र, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या आवारात कथित शिवलिंग सापडल्यानंतर स्वयंभू ज्योतिर्लिंगाची पूजा सुरू करण्यासाठी तसेच मुस्लिमांना ज्ञानवापी कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली असून ज्ञानवापी परिसर हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी करणारी याचिकाही करण्यात आली आहे.
वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसरात माँ शृंगार गौरीच्या पूजेसंदर्भातील याचिकेवर सुनावणीस परवानगी दिली आहे. या याचिकेला आव्हान देणारी अंजुमन इस्लामिया मशीद कमिटीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीचा हा वाद शतकानुशतके जुना आहे. या वादावरून २१३ वर्षांपूर्वी पहिल्यांदा दंगली झाल्या होत्या.