­तेजससाठी अमेरिका ११३ जेट इंजिन पुरवणार; एचएएल-जीईमध्ये ८८७० कोटींचा करार

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) सोबत १ अब्ज डॉलरचा (सुमारे ८८७० कोटी) करार केला आहे. या करारांतर्गत जीई भारताला १३ जेट इंजिन्स आणि एक सपोर्ट पॅकेज पुरवणार आहे.
­तेजससाठी अमेरिका ११३ जेट इंजिन पुरवणार; एचएएल-जीईमध्ये ८८७० कोटींचा करार
Published on

नवी दिल्ली : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) सोबत १ अब्ज डॉलरचा (सुमारे ८८७० कोटी) करार केला आहे. या करारांतर्गत जीई भारताला १३ जेट इंजिन्स आणि एक सपोर्ट पॅकेज पुरवणार आहे.

एचएएलने ‘एक्स’ (X) वरून या कराराबाबत माहिती दिली आहे. या इंजिन्सचा वापर ९७ मार्क-१ ए लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (तेजस फायटर जेट्स) मध्ये केला जाणार आहे. या इंजिन्सचे वितरण २०२७ ते २०३२ दरम्यान होणार आहे.

यापूर्वी, २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने ‘एचएएल’सोबत ६२,३७० कोटींचा करार केला होता. त्या करारानुसार ‘एचएएल’ भारतीय हवाई दलासाठी ९७ एलसीए तेजस मार्क-१ ए फायटर जेट्स तयार करणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये सरकारने ‘एचएएल’सोबत ४८ हजार कोटींचा करार करून ८३ ‘तेजस मार्क-१ए’ विमाने खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिकन इंजिन्सच्या पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे ‘एचएएल’ अद्याप एकही विमान हवाई दलाला देऊ शकले नाही.

‘एचएएल’ २०२८ पर्यंत सर्व विमाने हवाई दलाला देईल. ‘एचएएल’ला आतापर्यंत ‘जीई’कडून चार इंजिन्स मिळाली आहेत.

एलसीए तेजस ‘मार्क-१ए’ फायटर जेट लवकरच राजस्थानमधील पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या बिकानेरच्या नाल एअरबेसवर तैनात होणार आहे. संरक्षण मंत्रालयानुसार, हे विमान स्वसंरक्षण कवच आणि अत्याधुनिक कंट्रोल अ‍ॅक्च्युएटर्सने सुसज्ज असेल. तेजस मार्क-१ ए मधील ६५% हून अधिक घटक भारतात तयार केलेले आहेत.

चौथ्या पिढीतील विमान

‘मार्क-१ए’ हे एक सिंगल-इंजिन असलेले तेजस विमानाचे सुधारित रूप आहे. हे चौथ्या पिढीतील लाइट कॉम्बॅट जेट असून त्याची हलकी रचना आणि चपळता यासाठी ओळखले जाते. या विमानात अत्याधुनिक एव्हिऑनिक्स आणि आधुनिक रडार प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता अधिक वाढली आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने ‘मार्क-१ए’ आणि त्याआधीच्या तेजस आवृत्त्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि डीआरडीओ यांच्या मदतीने विकसित केल्या आहेत. ‘तेजस’ हे आकाश, जमीन आणि समुद्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये मोहिमा पार पाडू शकते आणि प्रतिकूल परिस्थितीतही अचूक हल्ले करण्यास सक्षम आहे.

logo
marathi.freepressjournal.in