हमासचा १३५ दिवसांचा युद्धबंदी प्रस्ताव, इस्रायल, अमेरिकेकडून थंडा प्रतिसाद

अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने हमास-इस्रायल युद्धाला विराम देण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू आहेत.
हमासचा १३५ दिवसांचा युद्धबंदी प्रस्ताव, इस्रायल, अमेरिकेकडून थंडा प्रतिसाद

जेरुसलेम : अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने हमास-इस्रायल युद्धाला विराम देण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू आहेत. त्यात हमासने १३५ दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याला इस्रायल आणि अमेरिकेकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

हमासने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ४५ दिवसांच्या तीन टप्प्यांत एकूण १३५ दिवस युद्धबंदी लागू करण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात वयाच्या १९ वर्षांच्या खालील इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैदी आणि हमासच्या ताब्यातील इस्रायलचे ओलीस यांची सुटका केली जावी. तसेच इस्यारलने गाझा पट्टीच्या दाट लोकवस्तीच्या भागांतून माघार घ्यावी. दुसऱ्या टप्प्यात इस्रायलने गाझातून पूर्ण माघार घ्यावी आणि दोन्ही बाजूंनी सर्व ओलिसांची अदलाबदली करावी. तर तिसऱ्या टप्प्यात सैनिकांच्या मृतदेहांची अदलाबदली करून दीर्घकालीन युद्धबंदी राबवण्यात यावी, असे हमासचे म्हणणे आहे.

हमासच्या या प्रस्तावाला इस्रायलकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे कठीण आहे, कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला पूर्णपणे संपवून गाजा पट्टीत बफर झोन निर्माण करण्याची तयारी चालवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी हमासचा प्रस्ताव जास्तच अपेक्षा करणारा आहे, असे म्हटले आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी दीर्घकालीन युद्धबंदीसाठी अजून बरेच काम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in