
हरियाणाच्या सोनीपतमधील राय येथील अशोका विद्यापीठात दोन विद्यार्थी संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल शुक्रवारी (दि.१४) 'व्हॅलेंटाईन डे'ला रात्री उशिरा विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले. 'फ्री प्रेस जर्नल'ने याचे वृत्त दिले आहे.
अहवालानुसार, एक विद्यार्थी विद्यापीठाच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडला, अशी माहिती आहे. तर दुसरा विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ मृत आढळला. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. विद्यापीठ व्यवस्थापनाने पोलिसांना आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सुरू केली.
यापैकी एका विद्यार्थ्याचे नाव ध्रुव ज्योती साहू असे असून त्याला रिभू सिंग (२०) म्हणूनही ओळखले जाते. तो तेलंगणाचा प्रथम वर्षाचा पदवीपूर्व विद्यार्थी होता. तो विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होता. विद्यापीठाच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडल्यानंतर तो मृतावस्थेत आढळला. त्याने जीवन संपवले असावे, असा पोलिसांना संशय आहे परंतु त्याच्या कुटुंबाशी बोलल्यानंतर ते याची पुष्टी करतील.
दुसरा विद्यार्थी, विघ्नेश गुडा साहू (१९) हा बेंगळुरूचा दुसऱ्या वर्षाचा पदवीपूर्व विद्यार्थी होता. शनिवारी पहाटे अडीच वाजता विद्यापीठाच्या गेटजवळ त्याचा मृतदेह आढळला.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस माहिती गोळा करत आहेत आणि काय घडले ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट होईल. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी कोणी जबाबदार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते कारवाई करतील.