

नवी दिल्ली: कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे खंडणी रॅकेट चालविणारा प्रमुख हस्तक हरचंद जाट उर्फ हॅरी बॉक्सर याला अमेरिकेतील कॅलिफॉर्निया प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि हरयाणाच्या विशेष कृती दलाने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर बॉक्सरने गोळीबार घडवून आणला होता.
राजस्थानमधील कोटपुतली-बेहरोर जिल्ह्यातील बामसर गावचा रहिवासी असलेला हॅरी बॉक्सर परदेशातून लॉरेन्स बिश्नोई टोळीचे खंडणी रॅकेट चालवण्यात मुख्य भूमिका बजावत होता. जयपूरमध्ये असताना त्याने बॉक्सिंग शिकले होते, ज्यावरून त्याला 'बॉक्सर' हे नाव पडले. सुरुवातीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा आणि बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून काम करणारा हॅरी नंतर गुन्हेगारी जगतात शिरला.
बॉलिवूड, उद्योगपतींना धमक्या
हॅरी बॉक्सरवर हत्या, हत्येचा प्रयत्न, हल्ला, गोळीबार आणि उद्योगपतींना धमकावून खंडणी वसूल करण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणासह देशभरात त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. रोहित शेट्टी, रणवीर सिंह आणि तुषार कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना धमक्या देण्यात त्याचा हात असल्याचे समोर आले आहे. चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बॉक्सरने स्वीकारली होती आणि सोशल मीडिया तसेच व्हॉईस मेसेजद्वारे धमक्या दिल्या होत्या. याशिवाय, कॅनडातील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबार प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते.
लूक-आऊट सर्क्युलर
फेब्रुवारीमध्ये मुंबई गुन्हे शाखेने अभिनेता रणवीर सिंगकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हॅरी बॉक्सरविरुद्ध 'लुकाऊट सर्क्युलर' जारी केले होते. तसेच अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात शस्त्रे पुरवणाऱ्या नेटवर्कशीही त्याचा संबंध जोडला गेला आहे. मध्य प्रदेशातील एका व्यावसायिकाला व्हॉट्स अॅपवर १५ कोटी रुपयांच्या खंडणीचा आंतरराष्ट्रीय कॉल आणि व्हॉईस मेसेज पाठवल्याप्रकरणी तुकोगंज पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतात आणण्याची प्रक्रिया
कॅलिफोर्नियात ताब्यात घेतल्यानंतर, हॅरी बॉक्सरला भारतात आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया (प्रत्यर्पण) लवकरच सुरू करतील. ही संपूर्ण प्रक्रिया भारताची मध्यवर्ती तपास यंत्रणा 'सीबीआय'च्या माध्यमातून पार पाडली जाण्याची शक्यता आहे.