संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हरयाणात पक्षहितापेक्षा नेत्यांचे हितसंबंधच वरचढ ठरले; विश्लेषण बैठकीत राहुल गांधी यांचे परखड मत

हरयाणामध्ये सत्ता येण्याचा ठाम विश्वास असलेल्या काँग्रेसला निवडणुकीतील पराभवामुळे धक्का बसला आहे.
Published on

हरयाणात काँग्रेसच्या नेत्यांमुळेच पक्षाचा पराभव झाला, पक्षहिताला महत्त्व देण्यात आले नाही, नेत्यांचे हितसंबंधच वरचढ राहिले, असे सडेतोड मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत नेत्यांचा नामोल्लेख टाळून व्यक्त केल्याचे समजते.

या बैठकीत निकालाचे अध्ययन करण्यासाठी तथ्य लोधक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती काँग्रेसचे उमेदवार आणि नेत्यांना भेटून आपला अहवाल काँग्रेसच्या अध्यक्षांकडे सुपुर्द करणार आहे. हरयाणामध्ये सत्ता येण्याचा ठाम विश्वास असलेल्या काँग्रेसला निवडणुकीतील पराभवामुळे धक्का बसला आहे. हा निकाल मान्य नसल्याचे एकीकडे काँग्रेस पक्षाने म्हटले असतानाच दुसरीकडे राहुल गांधी यांनी आपले वरील मत व्यक्त केले आणि पराभव नेमका कोणामुळे झाला याचे स्पष्ट संकेत दिले.

हरयाणाशी संबंधित अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेत्यांच्या बैठकीत मतमोजणीमध्ये आढळलेली अनियमितता आणि हरयाणा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांबाबत चर्चा झाली. आता राज्यातील नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे. हरयाणा निवडणुकीशी संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींकडे हरयाणाबाबतचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी हरयाणातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी बैठक झाली. या अनपेक्षित निकालाची निश्चित कारणे कोणती त्यावर चर्चा करण्यात आली. मतदानोत्तर आणि जनमत चाचण्यांनी जे दर्शविले होते त्यापेक्षा निकाल वेगळेच लागले, मतदानोत्तर चाचण्या आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये खूप फरक होता. त्यावर बैठकीत चर्चा झाली असून यापुढे योग्य ती पावले उचलण्यात देतील, असे माकन यांनी वार्ताहराना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in