बीजेपी-जेजेपीमध्ये 'ब्रेकअप'; हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

हरियाणा विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या ९० आहे. तर हरियाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे ४६ आमदारांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे.
बीजेपी-जेजेपीमध्ये 'ब्रेकअप'; हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. त्यापूर्वीच हरयाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मनोहरलाल खट्टर यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे हरयाणात भाजप आणि जननायक जनता पार्टी यांची पाच वर्षाची जुनी युती तुटली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजप आणि जेजेपीमध्ये मतभेद झाल्यामुळे मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा हरयाणाच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

मनोहरलाल खट्टर यांनी आज (१२ मार्च) सकाळी राज्यापाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर मंत्रिमंडळाने देखील राज्यपालांकडे राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत हरयाणाच्या १० जागांपैकी २ जागा जेजेपीने मागितल्या होत्या. परंतु, भाजपने त्या जागा देण्यास नकार दिल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हरयाणा विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या ९० आहे. तर हरयाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे ४६ आमदारांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. सध्या भाजपकडे ४१ आमदार आहेत तर, जननायक जनता पार्टीकडे १० आमदार असून १ अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळून ५२ असे संख्याबळ होते. तर दुसरीकडे काँग्रेसकडे ३० आमदार, अपक्ष ६ आमदार, हरियाणा लोकहित पार्टी आणि इंडियन नॅशनल लोक दल या दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी एक-एक आमदार आहे.

logo
marathi.freepressjournal.in