उत्तर भारतात हाहाकार

मुसळधार पावसाचे १४ बळी : दिल्लीत ४१ वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद
उत्तर भारतात हाहाकार

नवी दिल्ली : दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारताला रविवारी पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी १४ जणांचे बळी गेले आहेत. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचे पाच बळी गेले, तर लाहौल-स्पीती जिल्ह्यातील चंदरतळ क्षेत्रात सुमारे २०० जण अडकून पडले. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूल आणि वाहने वाहून जाण्याचे प्रकार घडले. तसेच नवी दिल्लीत २४ तासांत १४३ मिमी पावसाची नोंद झाली. दिल्लीत गेल्या ४१ वर्षांत पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. जम्मू-काश्मीरमध्येही अतिवृष्टी सुरू असून, तेथे लष्कराचे दोन जवान वाहून गेल्याचे वृत्त आहे. तसेच वायव्य भारतातील अनेक भागांत शनिवार-रविवारी जोरदार पाऊस झाला.

नवी दिल्लीत २१ जुलै १९५८ साली एका दिवसात २६६.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तो सर्वकालीन उच्चांक आहे. तो विक्रम मात्र अजून अबाधित आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिल्लीसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आधीच रविवारच्या पावसामुळे दिल्लीतील पार्क, सबवे, बाजार आणि काही हॉस्पिटलच्या आवारांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे तेथील रस्त्यांची दैना उडाली आहे. यामुळे शहराच्या जल निचरा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दिल्लीला लागून असलेल्या गुरगांव या नव्याने वसवण्यात आलेल्या शहरात देखील पावसाने दैना उडवली आहे. रस्त्यांवर जागोजागी पाणी भरल्यामुळे वाहतूककोंडी झाली आहे. तेथे देखील हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. यलो अलर्ट म्हणजे मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा असतो. दिल्लीप्रमाणे हिमाचल प्रदेशात देखील तुफान पाऊस कोसळत आहे. तेथे अतिवृष्टीने गेल्या २४ तासांत पाच जणांचे बळी घेतले आहेत. पैकी ३ जण शिमला येथे तर चंबा आणि कुल्लू या ठिकाणी प्रत्येकी एक जण दगावला आहे. हिमाचलमध्ये बियास नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. कांग्रा, मंडी आणि शिमला येथे एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मंडी जिल्ह्यातील लार्जी आणि सैज व बंजर या ठिकाणी ११ घरांचे पावसामुळे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांचा संपर्क तुटला व वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवावे लागले. हवामान खात्याने हिमाचलच्या सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in