
थिरुअनंतपुरम : केरळात ‘ईडी’ मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ईडीने केरळातील ५ जिल्ह्यात १५ ठिकाणी छापे मारले आहेत. चलन व्यापारी हवालामार्फत केरळातून आखाती देश, अमेरिका व कॅनडात ‘हवाला’मार्फत पैसे पाठवत असल्याचे उघड झाले. परकीय चलनाची डिलरशीप, भेटवस्तू व्यवसाय आणि कापड आणि सोन्याचा व्यवसाय या नावाने केलेले विदेशी चलन व्यवहार ईडीच्या तपासाच्या कक्षेत होते.
ईडीच्या १५० जणांच्या पथकाने कोचीच्या व्यावसायिक भाग असलेल्या ठिकाणी छापेमारी केली. त्यात मेनका शॉपिंग कॉम्प्लेक्स, ब्रॉडवे ब्युटी शॉप, घाऊक इलेक्ट्रॉनिक्स दुकाने आदींवर छापे मारले.
कोचीतून रोज ५० कोटी रुपयांचा हवाला व्यवहार होत असावेत, असा ‘ईडी’चा संशय आहे. या छापेमारीत गुप्त लॉकर्समध्ये भारतीय व परकीय चलन सापडले आहे. केरळात कोची हे हवाला व्यवहाराचे मोठे केंद्र आहे, असे ‘ईडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हवाला नेटवर्क व व्यवहाराच्या विरोधात तपास करण्यासाठी हे छापे मारण्यात आले आहेत. फेमा कायद्याच्या तरतुदींनुसार केरळातील परकीय चलन विनिमय ग्राहक आणि विदेशी चलन संस्थांद्वारे १० हजार कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आल्यावर हे शोध घेण्यात येत आहेत.
५० देशातून हवाला व्यवहार
केरळात सुमारे ५० देशांमधून हवाला व्यवहार होत आहेत आणि ‘ईडी’च्या पथकांनी गुप्त तिजोरीतून छापे मारताना मोठ्या प्रमाणात परकीय चलन जप्त केले होते, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गिफ्ट शॉप, ज्वेलरी स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल फोन आदी दुकानांवर छापे मारले.