

मुंबई : एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांनी २६ ऑक्टोबर रोजी त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुनर्नियुक्तीसाठी विचार न करण्याचा निर्णय शनिवारी घेतला आहे. एचडीएफसी बँकेने एका नियामकाला ही माहिती कळवली आहे.
जगदीशन हे बँकेत तीन दशके घालवल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी बँकेतून निवृत्त होतील. ऑक्टोबर २०२० मध्ये बँकेचे सीईओ म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर जगदीशन हे बँकेचे प्रमुख म्हणून त्यांचा दुसरा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत.
संचालक मंडळाने बँकेची वाढ, स्थिरता यातील त्यांचे योगदान, नेतृत्व आणि कॉर्पोरेट भारतातील सर्वात मोठ्या विलीनीकरणांपैकी एक यशस्वीपणे पूर्ण करण्यात त्यांच्या भूमिकेचे मनापासून कौतुक केले.
पदभार स्वीकारल्याच्या काही महिन्यांतच बँकेने आपली मूळ गृहकर्ज कंपनी एचडीएफसीचे स्वतःमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. तसेच व्यवसायाची कामगिरी, एचडीएफसीची देणी आणि दोन्ही संस्था एकत्र आल्यामुळे निव्वळ व्याज मार्जिन कमी होण्याबद्दल चिंता निर्माण झाली. मात्र, या विलीनीकरणाचा दीर्घकाळात फायदा होईल, असे व्यवस्थापनाने म्हटले होते.
यंदा मार्चमध्ये गैर-कार्यकारी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी बँकेतील नैतिक आणि प्रशासकीय पद्धतींबद्दल चिंता व्यक्त करत दिलेल्या आश्चर्यकारक राजीनाम्यानंतर जगदीशन यांच्या पुनर्नियुक्तीचा मुद्दा तीव्र चर्चेचा विषय बनला होता.
उत्तराधिकाऱ्याची निवड वेळेत पूर्ण करू
एचडीएफसी बँकेचे संचालक मंडळ जगदीशन यांच्या जागी नवीन उत्तराधिकाऱ्याची निवड आणि नियुक्तीची प्रक्रिया' वेळेत' वेगाने पूर्ण करेल, असे नियामकांना कळवले आहे. त्यांनी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती न घेण्याचा आपला निर्णय कळवला आहे. तसेच संचालक मंडळाने 'समजूत काढण्याचा/आग्रह करण्याचा' प्रयत्न करूनही त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार केला, असे त्यात पुढे म्हटले आहे.