HDFC बँक अध्यक्षांचे मार्च एंडिंग! खासगी बँकेतील नैतिक कारणांचा हवाला देत अतनू चक्रवर्ती यांचा अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा

देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी नैतिक कारणांचा हवाला देत अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
खासगी बँकेतील नैतिक कारणांचा हवाला देत अतनू चक्रवर्ती यांचा अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा
खासगी बँकेतील नैतिक कारणांचा हवाला देत अतनू चक्रवर्ती यांचा अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा
Published on

नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी नैतिक कारणांचा हवाला देत अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अर्धवेळ अध्यक्षाने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पद सोडले असून यामुळे बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच चक्रवर्ती यांचा राजीनामा चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यापूर्वी आला आहे.

१७ मार्च रोजी लिहिलेल्या राजीनामा पत्रात चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत मी बँकेत अशा काही घटना आणि पद्धती पाहिल्या आहेत. त्या माझ्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिकतेशी सुसंगत नाहीत. याच कारणास्तव मी हा निर्णय घेतला आहे.

गव्हर्नन्स, नॉमिनेशन, रेम्युनरेशन कमिटीचे अध्यक्ष एच. के. भानवाला यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, वर नमूद केलेल्या कारणांव्यतिरिक्त माझ्या राजीनाम्यामागे इतर कोणतेही भौतिक कारण नाही.

एचडीएफसी बँकेने बुधवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, चक्रवर्ती यांनी १८ मार्च २०२६ रोजी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. बँकेने सांगितले की, चक्रवर्ती यांच्या राजीनामा पत्रावर १७ मार्च २०२६ ही तारीख असली तरी ते बँकेला १८ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.१७ वाजता प्राप्त झाले.

मूळ संस्था एचडीएफसी लिमिटेडच्या बँकेसोबतच्या विलीनीकरण प्रक्रियेदरम्यान चक्रवर्ती यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. १ जुलै २०२३ रोजी हे विलीनीकरण पूर्ण झाले. यातून १८ लाख कोटी रुपयांहून अधिक ताळेबंद असलेली एक महाकाय आर्थिक संस्था उभी राहिली. या माध्यमातून देशातील दुसरी मोठी खासगी बँक ती बनली.

पूर्ण फायदे अजून बाकी... मे २०२१ मध्ये मी बँकेच्या संचालक मंडळात सहभागी झालो. माझ्या कार्यकाळात एचडीएफसी लिमिटेडसोबतच्या विलीनीकरणासारखी ऐतिहासिक घटना घडली. यामुळे ही बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनली. मात्र या विलीनीकरणाचे पूर्ण फायदे मिळणे अजून बाकी आहे. मी स्वतंत्र आणि बिगर-कार्यकारी संचालकांचे आभार मानतो. संस्थेच्या मध्यम आणि कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. ही ऊर्जा एका पुनर्कल्पित संस्थेचा गाभा असायला हवी.

(अतनू चक्रवर्ती यांच्या राजीनामा पत्रातील मजकूर)

राजीनाम्याचा पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले होते...

चक्रवर्ती यांना राजीनाम्याचा पुनर्विचार करण्यास, स्पष्टीकरणास आणि पत्रातील भाषा बदलण्यास सांगण्यात आले होते, असा दावा एचडीएफसी बँकेचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शशीधर जगदीशन यांनी गुरुवारी केला. चक्रवर्ती यांना राजीनामा देण्याच्या त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास, नैतिकतेशी संबंधित त्यांच्या चिंता सविस्तरपणे मांडण्यास आणि राजीनामा पत्रातील काही शब्द किंवा भाषा मागे घेण्यास सांगण्यात आले होते, असे ते म्हणाले.

बँकेचा पाया मजबूतच! अर्थ मंत्रालयाची ग्वाही

एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर एका दिवसाने- गुरुवारी अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही बँक मजबूत पाया असलेली एक भक्कम संस्था असल्याचे म्हटले आहे. वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी पत्रकारांना सांगितले की, रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, एचडीएफसी बँक ही एक भक्कम संस्था असून तिचा पाया अत्यंत मजबूत आहे.

बँकेच्या कामकाजाबाबत चिंता नाही! रिझर्व्ह बँकेकडून पाठराखण

एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी नैतिक कारणांचा हवाला देत राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच रिझर्व्ह बँकेने गुरुवारी स्पष्ट केले की, बँकेचे कामकाज किंवा प्रशासनाबाबत कोणतीही गंभीर चिंता नोंद नाही. रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे की, एचडीएफसी बँक ही भक्कम आर्थिक स्थिती, व्यावसायिकरीत्या चालवले जाणारे बोर्ड आणि सक्षम व्यवस्थापन संघ असलेली देशातील महत्त्वाची बँक आहे. वेळोवेळी केलेल्या आमच्या मूल्यांकनाच्या आधारावर बँकेचे वर्तन किंवा प्रशासनाबाबत कोणतीही गंभीर चिंता नोंदविण्यात आलेली नाही. बँक भांडवलाच्या बाबतीत सक्षम आहे आणि पुरेशा तरलतेसह तिची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे, यावरही आरबीआयने यावर भर दिला.

कोण आहेत चक्रवर्ती?

चक्रवर्ती हे गुजरात केडरचे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी आर्थिक व्यवहार सचिव आणि 'दिपम' सचिव म्हणून काम पाहिले आहे. एप्रिल २०२० मध्ये आर्थिक व्यवहार सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर एका वर्षाने-५ मे २०२१ रोजी चक्रवर्ती यांची अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती.

केकी मिस्त्री अंतरिम अर्धवेळ अध्यक्ष नियुक्त

आरबीआयने बँकेच्या विनंतीनुसार संक्रमणकालीन व्यवस्थेला मंजुरी दिली असून केकी मिस्त्री यांची तीन महिन्यांसाठी अंतरिम अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या अर्जावरून रिझर्व्ह बँकेने १८ मार्च २०२६ रोजी केकी मिस्त्री यांची १९ मार्च २०२६ पासून नियुक्ती करण्यास मान्यता दिली.

बँकेचे शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरले; एचडीएफसीच्या बाजारमूल्यात ६५,९४६ कोटींची घट

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेचे अध्यक्ष म्हणून अतनू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये (शेअर्समध्ये) ५ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण झाली.

'ब्लू-चिप' बँक समभागात ५.१३ टक्क्यांची घसरण झाली आणि मुंबई शेअर बाजारात तो ७९९.७० रुपयांवर स्थिरावला. दिवसाच्या सुरुवातीला झालेली तीव्र घसरण त्याने काही प्रमाणात भरून काढली. दिवसादरम्यान समभाग ८.४१ टक्क्यांनी कोसळून ७७२ रुपयांवर पोहोचला होता. हा त्याचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजारात बँक समभाग ५.३१ टक्क्यांनी घसरून ७९८.२० रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान त्यात ८.६६ टक्क्यांची मोठी घसरण होत त्याने ७७० रुपयांचा ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.

समभागातील तीव्र घसरणीमुळे कंपनीच्या बाजारमूल्यात ६५,९४६.०८ कोटी रुपयांची घट झाली आणि ते १२,३०,८९६.८५ कोटी रुपयांवर आले.

logo
marathi.freepressjournal.in