
उत्तरप्रदेशमध्ये प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. महाकुंभ मेळ्यात प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमात स्नान करणे हिंदु धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाने सर्व पापांतून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाकुंभ मेळ्यात अशीच पवित्र डुबकी लगावण्यासाठी एक कथित तस्कर देखील कुंभमेळ्यात पोहोचला. मात्र, कोट्यवधि भाविक असतानाही पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटला नाही आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या
प्रवेश यादव (वय 22, अलवर, राजस्थान) असे या तस्कराचे नाव आहे. दारुची तस्करी करणे आणि अन्य गुन्हे त्यावर दाखल आहे. जुलै 2023 मध्ये पोलिसांनी तिघांना पकडले होते. मात्र, तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. गेल्या दीड वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
टाइम्स ऑफ इंडियाने त्याचे वृत्त दिले आहे, भदोहीचे पोलीस अधीक्षक अभिमन्यू मंगलिक यांनी पीटीआयला सांगितले की, प्रवेश यादव दीड वर्षांपासून फरार होता. 29 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19 वर वाहन तपासणी दरम्यान, अलवरहून बिहारला तस्करीसाठी आणलेली भेसळयुक्त दारू जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी प्रदीप यादव आणि राज डोमोलिया यांना भदोहीमधील उंज पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली, तर प्रवेश यादव घटनास्थळावरून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
मंगलिक यांनी आरोप केला की हे तिघेही जण अलवर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि ते बऱ्याच काळापासून बिहारमध्ये अवैध दारूची तस्करी करत होते. त्याच्याविरुद्ध आयपीसी, उत्पादन शुल्क कायदा आणि गुंड कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकाऱ्याने सांगितले की यादव पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजला पोहोचला होता परंतु प्रभावी देखरेखीमुळे पोलिसांनी त्याला अटक केली.