Bharat Jodo Yatra : ...तर भारत जोडो यात्रा थांबवावी; आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत (Bharat Jodo Yatra) मोठी बातमी समोर आली.
Bharat Jodo Yatra : ...तर भारत जोडो यात्रा थांबवावी; आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढले आहे. चीनमध्ये अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागल्यानंतर भारतामध्येही कोरोनाची भीती वाढू लागली आहे. चीन व्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्येही कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतानेही सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. अशामध्ये आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी भारत जोडो यात्रेबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहिले आहे. यात ते म्हणाले आहेत की, "नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी." राहुल गांधींसोबतच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनादेखील पत्र लिहिले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी पत्रामध्ये लिहलेले आहे की, "कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी."

यावरून आता काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, "राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा ही २१ डिसेंबरला पार पडली. मात्र, येथे जमलेल्या गर्दीला हे केंद्र सरकार एवढे घाबरले की, २० डिसेंबरला त्यांनी राजस्थानमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे पत्र राहुल गांधींना लिहिले. वाढत्या जनसमर्थनाच्या भीतीने भारत जोडो यात्रेला खीळ घालण्याचा भाजपचा हेतू असल्याचे यावरून स्पष्ट होते. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी त्रिपुरामध्ये एक रॅली केली, तिथे कोरोना नियमांचे पालन केले गेले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधानांनी बंगालमध्ये मोठ्या रॅली काढल्या. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे उद्दिष्ट राजकीय नसेल आणि त्यांची चिंता रास्त असेल, तर त्यांनी पहिले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहायला हवे."

तर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, "आरोग्यमंत्र्याच्या पत्रावरून भारत जोडो यात्रेला भाजप किती घाबरली आहे हे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्पला नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, बंगालमध्ये प्रचार करताना, तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर देशात कोरोना वाढला नसता. यात्रा योग्य दिशेने सुरु आहे हे स्पष्ट केले आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in