
नवी दिल्ली : भारतात सध्या लठ्ठपणा ही मोठी समस्या झाली आहे. या लठ्ठपणाला आमंत्रण देणाऱ्या कचोरी, समोसा, वडापाव, जिलेबी, छोले-भटुरे आदी भारतीय पदार्थांतून किती चरबी (फॅटस्) व साखर (शुगर) शरीरात जमा होते, याचे फलक सर्वत्र लावण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य खात्याने दिले आहेत.
भारतात सर्वत्र रस्त्यावर किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर वडापाव, कचोरी, समोसा हे पदार्थ लोक चवीचवीने खात असतात. जलेबी, रबडी आदी पदार्थ आवडीने खातात. या पदार्थांमध्ये तेल व साखरेचे प्रमाण अधिक असते. परिणामी, लोकांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. या लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे.
सिगारेट, तंबाखूप्रमाणे समोसा आणि जिलेबीवर ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाईल. मुलांमध्ये लठ्ठपणा आणि युवकांमध्ये वाढणारे वजन यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘जंक फूड’वर इशारा देणारी सूचना लावण्याची तयारी केली आहे.
रिपोर्टनुसार, आरोग्य मंत्रालयाने ‘एम्स’सह अनेक केंद्रीय संस्थांना अशाप्रकारचे पोस्टर्स लावण्याचे आदेश दिले आहेत. ज्यात स्पष्टपणे दररोज करण्यात येणाऱ्या नाश्त्यात किती फॅट आणि साखर आहे त्याचा उल्लेख करण्यात यावा. विशेषत: पहिल्यांदाच अशाप्रकारे ‘जंक फूड’वर तंबाखूसारखा इशारा देणारी सूचना जारी करण्याची तयारी करण्यात आली आहे
आरोग्य सचिव पुण्य सलील श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतात तरुण व लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. लहान मुलांतील लठ्ठपणा हा ‘जंक फुड’च्या सवयी व शारीरिक मेहनत कमी केल्याने वाढला. २०२१ मध्ये १८ कोटी लोक लठ्ठ होते. २०५० पर्यंत हेच प्रमाण ४४.९ कोटीवर जाणार आहे. २०५० मध्ये भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लठ्ठ व्यक्ती असणारा देश ठरणार आहे.
लठ्ठपणा म्हणजे आजाराला निमंत्रण
लठ्ठपणामुळे मधुमेह, ह्रदयाचे आजार, विशिष्ट कर्करोग, तणाव आदी विकार होतात. त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. तसेच आजारी पडल्यास त्याचा आर्थिक बोजा त्याच्या कुटुंबावर पडत असतो. तसेच त्या व्यक्तीची उत्पादन क्षमता कमी होते. यंदा २८ जानेवारी २०२५ रोजी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ मोहीम जारी केली. भारतीयांनी दहा टक्के तेल कमी वापरावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
पाश्चिमात्य पदार्थांनाही नियम लागू करावे - देवरा
पाश्चिमात्य देशांचे अन्नपदार्थ संस्कृती भारतात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. या पाश्चिमात्य पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढत आहे. देशी पदार्थांबरोबरच परदेशी जंक फूडस्वर तसेच मोठ्या कंपन्यांवरही नियमांची सक्ती करावी, अशी मागणी खासदार मिलिंद देवरा यांनी केली.