महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लाईव्ह होणार;सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

२७ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे.
 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लाईव्ह होणार;सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. या लाईव्हची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. ‘बार अॅण्ड बेंच’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

२७ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, यावर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असून या वादावर येत्या मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याच जो निर्णय घेतला आहे, तो या सुनावणीपासून लागू होणार आहे.

घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘फूल कोर्ट मीटिंग’मध्ये घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केले होते. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आले होते.

१३ दिवसांत पाच हजार प्रकरणे निकाली

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी अवघ्या १३ दिवसांत पाच हजारांवर प्रकरणे निकाली काढली आहेत. ‘बार अॅण्ड बेंच’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १३ दिवसांत एकूण ५,११३ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये २८३ नियमित, १,२१२ हस्तांतर केलेल्या, तर ३,६१८ अन्य प्रकरणांचा समावेश आहे. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायप्रक्रियेत जे बदल केलेत, त्यापैकी हा एक बदल आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयात कामाच्या दिवशी नियमित प्रकरणाच्या सुनावणी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेदरम्यान घेण्यात येत आहेत. तर अन्य दिवशी दुपारी २ ते ४ या वेळात इतर प्रकरणांच्या सुनावणी घेण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in