

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसामुळे मेट्रो स्थानके आणि अनेक रस्त्यांवर पाणी साचले, तसेच ३६ झाडे पडली. पाणी साचल्याबाबत एकूण १३६ तक्रारींची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सूनच्या चार प्रणालींमुळे हा पाऊस पडला. सध्या देशावर हवामानाच्या दोन प्रणाली सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमधून पुढे सरकत आहे. हवामान विभागाने पुढील ४-५ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा, तर पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
गुजरातमध्ये पूरस्थिती
दरम्यान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे टाटा मोटर्सचा साणंद येथील प्रकल्प आणि आसपासच्या अनेक पुरवठादारांचे युनिट्स बंद ठेवावे लागले.दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये दरडी कोसळल्यामुळे तीर्थयात्रेचे मार्ग बंद झाले आहेत. चार धाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. चंपावत, बागेश्वर आणि टिहरी येथील शाळा आणि अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.