
नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतात काहीशा विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून, झारखंड आणि ओदिशाला रविवारी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गेला आठवडाभर अतिवृष्टीने थैमान घातलेल्या उत्तर भारताला गेले दोन-तीन दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला होता, पण शनिवारी संध्याकाळपासून दिल्लीत पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पुन्हा पाणी साचले आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी दुपारी दोन वाजता यमुनेची पाणी पातळी २०५.७८ मीटर्सवर पोहोचली होती. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), पोलीस आणि अन्य बचाव पथके नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत करत होती. गाळ अडकल्याने बंद झालेले यमुना बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी नौदलाचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्लीसह उत्तर आणि पूर्व भारतातही पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, सिरमौर, कुलू आणि सिमला या जिल्ह्यांत सोमवारपर्यंत मध्यम ते गंभीर पुराचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी हवामान खात्याने झारखंड आणि ओदिशाला या राज्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.