आसाममधील अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा दोन लाख लोकांना फटका

आसाममधील अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा दोन लाख लोकांना फटका

देशातील एका भागात उष्णतेने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पुराने थैमान घातले आहे. आसाममधील अनेक भागांना अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे. यामुळे दोन लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांत रस्ते आणि रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आहे.

मंगळवारी आसाम आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला असून भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, भूस्खलनात एका महिलेसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये दोन लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी लष्करासह निमलष्करी दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, एसडीआरएफ, नागरी प्रशासन आणि प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. कचार जिल्हा प्रशासन आणि आसाम रायफल्स यांच्या संयुक्त उपक्रमाने बरखला भागातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस या प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच हवामान खात्याने बुधवारी आसाममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in