
नवी दिल्ली : मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी दुपारी राष्ट्रीय राजधानीत अनेक ठिकाणी पाणी साचले. पावसामुळे दिल्लीच्या किमान तापमानातही घट झाली. दिल्लीचे किमान तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. “दिल्ली, एनसीआर आणि परिसरात गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह मुसळधार पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहतील,” असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. आयएमडीने म्हटले आहे की दिल्ली आणि एनसीआरमधील हिंडन एअर फोर्स स्टेशन, गाझियाबाद, इंदिरापुरम, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, सोनीपत आणि बल्लभगड या भागात जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस अपेक्षित आहे.