रांची : रांची येथील विशेष न्यायालयाने शनिवारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ५ फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी दिली.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी अटक केलेल्या सोरेन यांनी विशेष पीएमएलए (मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा) न्यायालयासमोर याचिका दाखल केली आणि नवीन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी मागितली. आपण विधानसभेचे सदस्य आहोत आणि विशेष अधिवेशनात भाग घेण्याचा अधिकार आहे, अशी विनंती सोरेन यांनी न्यायालयासमोर केली. त्यानुसार न्यायालयाने हेमंत सोरेन यांना ठरावाच्या कामकाजावेळी सभागृहात हजर राहण्याची परवानी दिली. महाधिवक्ता राजीव रंजन यांनी सांगितले की, ईडीने या याचिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
मंगळवार आणि बुधवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांना ईडीने अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री बनले आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले होते. चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे. त्याला हजर राहण्याची परवानगी हेमंत सोरेन यांना मिळाली आहे.