
रांची : ‘झामुमो’ नेते हेमंत सोरेन यांनी गुरुवारी चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरुवारी रांची येथील मोरहाबादी मैदानावर राज्यपाल संतोष गंगवार यांनी त्यांना पदाची शपथ दिली. हेमंत सोरेन यांचा एकट्याचाच शपथविधी गुरुवारी पार पडला. या सोहळ्याला इंडिया आघाडीतील १० पक्षांचे १८ प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपस्थित होते. शपथविधीच्या वेळी हेमंत सोरेन त्यांचे वडील शिबू सोरेन यांना हात धरून कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेले. शपथ घेण्यापूर्वी ते म्हणाले, ‘आजचा दिवस ऐतिहासिक असेल. आपली एकता हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. आम्ही विभाजित किंवा संतुष्ट होऊ शकत नाही. आम्ही झारखंडी आहोत आणि झारखंडी झुकत नाहीत’.
मंत्रिपदासाठी रस्सीखेच
सोरेन सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्यामुळे सोरेन यांच्याबरोबर अन्य कुणाचाही शपथविधी होऊ शकला नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असून चर्चेअंती यातून मार्ग काढला जाणार आहे.