मुंद्रा बंदराजवळ हेरॉइन जप्त, दहशतवादी विरोधी पथकाने केली कारवाई

एका कंटेनरमध्ये ३७६ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे अंमली पदार्थ आढळून आले आहे.
 मुंद्रा बंदराजवळ हेरॉइन जप्त, दहशतवादी विरोधी पथकाने केली कारवाई
Published on

गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७५.३ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. कच्छ जिल्ह्यातील अदानी समूहाच्या मालकीच्या मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये ३७६ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे अंमली पदार्थ आढळून आले आहे.

गुजरात एटीएस आणि पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांनी या कंटेनरमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी दिली.

हा सर्व माल १३ मे रोजी मुंद्रा बंदरामध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणण्यात आला. हा माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता. या कंटेनरमधील अंमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे पाईप वापरण्यात आले होते. हे पाईप कार्डबोर्डचे वाटू नयेत म्हणून त्यावर निळ्या रंगाचे प्लास्टिक लावून हेरॉइन लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in