भविष्यात हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान; असदुद्दीन ओवेसी यांचे भाकीत

विष्यात हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान बनेल. पण ते पाहायला कदाचित मी जिवंत नसेन, असे भाकीत एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.
भविष्यात हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान; असदुद्दीन ओवेसी यांचे भाकीत
Published on

हैदराबाद : भविष्यात हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान बनेल. पण ते पाहायला कदाचित मी जिवंत नसेन, असे भाकीत एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

भारताला मुस्लीम पंतप्रधान कधी मिळणार? असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, भविष्यात एक दिवस असा येईल की हिजाब घातलेली महिला देशाची पहिली मुस्लीम पंतप्रधान बनेल आणि देशावर राज्य करेल. कदाचित तो दिवस पाहण्यास मी जिवंत नसेन. पण हे नक्की घडेल, असे ओवेसी म्हणाले.

इंडिया आघाडीशी युती का केली नाही यासंदर्भात ओवेसी म्हणाले की, आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीनवेळा इंडिया आघाडीचा भाग होण्यासाठी निरोप दिला. मात्र, त्यांच्या निरोपाची साधी दखलही इंडिया आघाडीने घेतली नाही. कुणी जर आम्हाला आघाडीत घ्यायला तयार नसेल तर आम्ही त्यांच्या मागे का लागावे? उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांत आम्ही छोट्या पक्षांशी आघाडी केली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमची राजकीय वाटचाल सुरूच ठेवू, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले.

भाजपला पराभव दिसत आहे

या लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपचा पराभव करण्याचे ठरवले आहे. भाजपला हा पराभव दिसत आहे. म्हणूनच त्यांनी जी-२० परिषद, चांद्रयान, ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व, विश्वगुरु, विकसित भारत असे मुद्दे सोडून जुनीच हिंदुत्वाची विचारसरणी अंगिकारली आहे. तीच त्यांची खरी ओळख आहे आणि ती आता पुढे येत आहे, असेही ओवेसी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in