"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत ‘हिंदवी स्वराज्या`ची स्थापना नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्याला देशात पुन्हा करायची आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

विशेष प्रतिनिधी

मुंबई: ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत ‘हिंदवी स्वराज्या`ची स्थापना नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्याला देशात पुन्हा करायची आहे. आणि ही स्वराज्य स्थापना करण्यापासून आपल्याला कोणाचाही बाप रोखू शकत नाही. मागच्या वेळी मी पालघरमध्ये आलो होतो तेव्हा सायंकाळची वेळ होती; तेव्हा आपण काँग्रेसचा सूर्यास्त केला होता. आज मला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे दुपारच्या वेळात पालघरमध्ये घेऊन आले आहेत. हे ‘हिंदवी स्वराज्या`साठीचे सुचिन्ह आहे,` अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांनी आपल्या हिंदुत्ववादी तेजस्वी विचारांतून ‘नवीन भारता`करता ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज व्यक्त केली. 

पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन शनिवार, 18 मे रोजी नालासोपारा पश्चिम-श्रीप्रस्था रोड येथील स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात आले होते. या सभेतून योगी यांनी इंडिया गठबंधनसह पाकिस्ताचा समाचार घेतला.  

100 वर्षे गेली तरी राममंदिर निर्माण होणार नाही, अशी खिल्ली त्या वेळी इंडिया गठबंधनमधील नेते उडवत होते. पण आम्ही ते काम करून दाखवले. अयोध्येत राममंदिर बांधून दाखवले, याचा अभिमान योगी आदित्यनाथ यांनी या वेळी व्यक्त केला. पण आता यांच्या तोंडून दोन वाईट गोष्टी बाहेर पडत आहेत. इंडिया गठबंधनचे सरकार आले; तर राममंदिराचे काय करायचे हे आम्ही बघू, अशी धमकी हे दाखवत आहेत. पण रामलल्ला त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचण्याच्या लायक ठेवणारच नाहीत, असा विश्वास योगी यांनी व्यक्त केला. दुसरी गोष्ट म्हणजे; हिंदूंच्या बाजूने रामंदिर निर्माणाबाबत कोर्टाचा निर्णय आला तर देशभरात दंगली होतील, रक्ताचे पाट वाहतील, अशी भीती हे घालत होते. अखेर कोर्टाचा निर्णय आला. राममंदिराचा शिलान्यास झाला; किंबहुना राममंदिर बांधून तयारही झाले. पण कुठे ठिणगीही पडली नाही. दंगल तर लांबच राहिली. उत्तर प्रदेशात मागील सात वर्षांत एकदाही दंगल झालेली नाही, अशी माहिती योगी यांनी या वेळी दिली. 

तुमच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण राम मंदिर बांधून दाखवू शकतो, तर मोठमोठ्या दंगलखोरांचे, माफियांचे रामनाम सत्य करण्याची ताकदही ठेवतो, अशी धमक योगी यांनी इंडिया गठबंधनच्या नेत्यांना दाखवली. आणि हे आपण करूनही दाखवले आहे. याआधी त्या ठिकाणी मोठमोठे माफिया सत्तेचे संचलन करत होते. धमक्या देत होते. घाबरवत होते. अराजकता पसरवत होते. व्यापारी आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी धोका बनलेले होते. तिथल्या विकासाच्या आडवे येत होते. पण आपण बुलडोझर चालवून एका झटक्यात ही सफाई करून टाकली. उत्तर प्रदेशात आज हे सगळं साफ झाले आहे. तिथे दंगलीचा कोणी विचारही करत नाही. इतकेच नव्हे; तर त्या ठिकाणी रस्त्यावर कोणी आता नमाजही अदा करत नाही. मशिदींवरचे भोंगेही उतरले आहेत. पुढच्या पाच वर्षांत अशा पद्धतीने ओरड होत होती, हेदेखील विसरतील, असा विश्वास मोदी यांनी या वेळी दिला. 

आपल्याला ‘एक भारत, श्रेष्ठ भारत` ही संकल्पना सत्यात उतरवायची असेल तर सर्वांचा सन्मान करावा लागेल. भारतातील महापुरुषांना सन्मान द्यावा लागेल. देवदेवतांप्रति आदराची भावना ठेवावी लागेल. प्रत्येक मुलीला संपूर्ण सुरक्षितता द्यावी लागेल. प्रत्येक व्यापाऱ्याला संरक्षण द्यावे लागेल. प्रत्येक युवकाला रोजगार द्यावा लागेल. प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणावा लागेल. आणि हीच तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘हिंदवी स्वराज्या`ची संकल्पना आहे. हेच काम नरेंद्र मोदी करत आहे. मागील 10 वर्षांत अशाच पद्धतीने आपण बदला भारत पाहत आहोत, अशा शब्दांत योगी यांनी नव्या भारताची संकल्पना विषद केली.

भारताला आत्मनिर्भर व आत्मविकसित करण्याची ताकद केवळ मोदींत!

चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. संपूर्ण देशात मोदीमय वातावरण आहे. त्यानंतरही इंडिया आघाडीवाले विचारत आहेत, चार सौ पार कसे जाणार? पण ज्यांनी रामाला आणले आहे, तेच मोदींना आणणार आहेत. त्यामुळे या वेळी चारशे पार आपल्याला जायचं आहे. मोदींनी सर्वांना सन्मान मिळवून दिला आहे. विकास दिला आहे. त्यामुळे देशावर रामभक्त  सत्ता स्थापित करणार; की रामद्रोही हे तुम्हाला ठरवायचे आहे. भारताला आत्मनिर्भर व आत्मविकसित करण्याची ताकद केवळ मोदींत आहे. काँग्रेस व त्यांच्या इंडिया गठबंधनचे विसर्जन करण्याची हीच वेळ आहे, असे योगी म्हणाले. इंडिया गठबंधनमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी फार पूर्वीच औरंगजेबाचा खात्मा केलेला आहे. आता महाराष्ट्रात औरंजेब आणि त्याच्या पिलावळीला येऊ द्यायचे नाही, असे आवाहन सरतेशेवटी योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. त्यासाठी मोदींच्या नेतृत्वात पालघर लोकसभा मतदारसंघातून डॉ. हेमंत सवरा यांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in