हिंडेनबर्गवरून धुरळा! ‘सेबी’ अध्यक्षा आरोपीच्या पिंजऱ्यात; राजीनाम्यासाठी विरोधकांचा हल्लाबोल

अमेरिकेची हिंडेनबर्ग आणि अदानी समुह यांच्यादरम्यान सुरू असलेल्या वादात आता थेट ‘सेबी’ अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांचे नाव आल्याने या प्रकरणाने तीन वर्षानंतर पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.
‘सेबी’ अध्यक्षा आरोपीच्या पिंजऱ्यात
‘सेबी’ अध्यक्षा आरोपीच्या पिंजऱ्यात
Published on

मुंबई : अमेरिकेची हिंडेनबर्ग आणि अदानी समुह यांच्यादरम्यान सुरू असलेल्या वादात आता थेट ‘सेबी’ अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांचे नाव आल्याने या प्रकरणाने तीन वर्षानंतर पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. अदानी समुहातील गुंतवणुकीवरून अमेरिकी वित्तसंस्थेला तपासाकरिता भारतातील कायद्याच्या कक्षेत आणणाऱ्या माधवी पुरी-बुच यांच्याच विरोधात हिंडेनबर्गने तथाकथित गुंतवणुकीचे आरोप केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, माधवी पुरी-बुच यांनी आपले पद व आपला पूर्वेइतिहास पारदर्शक` असल्याचा दावा केला आहे. हिंडेनबर्गचे आरोप हे बिनबुडाचे असून महत्त्वाच्या पदावर विराजमान होण्यापूर्वीच आपण गुंतवणूक जाहीर करण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला आहे, तर अदानी समुहाने हिंडेनबर्गने आपले पूर्वीचे आरोप नव्याने केले असून त्यात कोणतेही तत्थ्य नसल्याचे लगेचच स्पष्ट केले.

अदानी समुहातील कंपन्यांमध्ये ‘सेबी’च्या अध्यक्षा व त्यांचे पती धवल बुच यांची गुंतवणूक असल्याचा आरोप करणारा सविस्तर अहवाल हिंडेनबर्गने शनिवारी जाहीर केला होता. अदानी समुहातील, विशेषत: भारताबाहेरील कंपन्यांमध्ये माधवी पुरी- बुच व त्यांचे पती यांची गुंतवणूक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. भारतातील अर्थव्यवस्थेबाबत आपण आणखी एक धक्कादायक अहवाल जारी करू. असे हिंडेनबर्गने यापूर्वीच जाहीर केले होते.

काँग्रेसची ‘जेपीसी’मार्फत चौकशीची मागणी

हिंडेनबर्गने केलेल्या नव्या आरोपानंतर ‘सेबी’ अध्यक्षांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, देशाच्या महत्त्वाच्या नियामक यंत्रणेच्या प्रमुखपदावरील व्यक्तीवरील हे आरोप गांभीर्यांने घेण्याची गरज असून, गुंतवणुकीबाबत सखोल चौकशी व्हावी, असे म्हटले आहे.

अर्थव्यवस्था विस्कळीत करण्याचा डाव - भाजप

‘सेबी’ अध्यक्षांवर आरोप करून देशाची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. भारत विकसिततेकडे प्रवास करत असताना, तसेच देशाचे भांडवली बाजार विक्रमी नोंद करत असताना विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचे भाजपने म्हटले आहे. हिंडेनबर्गच्या तपासाबाबत यापूर्वीच चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले, तर जबाबदार कोण - राहुल गांधी

अमेरिकेतील हिंडेनबर्गने अदानी समूह आणि भारतीय शेअर बाजार नियंत्रक अर्थात ‘सेबी’ यांच्यावर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सेबीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “किरकोळ गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या ‘सेबी’ची विश्वासार्हता, त्यांच्या अध्यक्षांवरील आरोपांमुळे धोक्यात आली आहे. ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही?, असा प्रश्न देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदार सरकारला विचारत आहेत. गुंतवणूकदारांनी कष्टाने कमावलेला पैसा बुडाला तर त्याला जबाबदार कोण? अदानींवर लावलेले नवीन आणि अत्यंत गंभीर आरोप पाहता, सर्वोच्च न्यायालय स्वत:हून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करेल का?,” असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

माझे व्यवहार पारदर्शकच!

"भारतीय नियामक यंत्रणेच्या महत्त्वाच्या पदावर आल्यानंतर आणि येण्यापूर्वीही माझे व्यक्तिगत आयुष्य तसेच माझी कारकीर्द पारदर्शक राहिली आहे. सेबीचे संचालक पद स्वीकारण्यापूर्वीच मी कायद्याप्रमाणे सर्व माहिती नोंदविलेली आहे. आरोप करण्यात आलेले व्यवहार वा कंपनी यांच्याशी माझा तसेच माझ्या पतीचा काहीही संबंध नाही. हिंडेनबर्गचे आरोप म्हणजे पूर्वग्रहदूषित व हेतुपुरस्सर दावे आहेत. अदानीबाबत ‘सेबी’कडून योग्य चौकशी करण्यात आली आहे. एकूण २४ पैकी केवळ दोनच तपास प्रलंबित आहेत". - माधवी पुरी-बुच, सेबी अध्यक्ष.

logo
marathi.freepressjournal.in