
नवी दिल्ली : हिंदी भाषा ही भारतीय भाषांमधील विविधता एकत्र करते. देशाच्या महत्वाच्या व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हिंदी हीच राष्ट्रभाषा म्हणून योग्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.
हिंदी भाषा दिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासीयांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर हिंदीचे महत्व लक्षात घेऊन घटनाकारांनी १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदीला देशाची राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारतातील विविध भाषांच्या विविधतेला एका सूत्रात बांधण्याचे काम हिंदीने केले आहे. भारत हा कायम विविध भाषांचा देश राहिलेला आहे. देशाला एकसंघ ठेवण्यात हिंदीने मोठी भूमिका बजावली आहे.
सर्व भारतीय भाषा व बोली भाषा हा आमचा सांस्कृतिक ठेवा आहे. हिंदीची कोणत्याही भाषेशी स्पर्धा नव्हती व राहणार नाही. आमच्या सर्व भाषांना सशक्त केल्यानंतर भारत हे मजबूत राष्ट्र बनेल. हिंदी ही सर्व भाषांना सशक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.