मालवाहतूक एक-दोन दिवसात पूर्वपदावर;ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा निर्वाळा

एआयएमटीसीच्या प्रतिनिधींनी मंगळवारी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन हिट अँड रन प्रकरणांसाठी कठोर तरतुदींचा मुद्दा उपस्थित केला होता
मालवाहतूक एक-दोन दिवसात पूर्वपदावर;ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा निर्वाळा
Published on

नवी दिल्ली : हिट-अँड-रन प्रकरणांवरील नवीन कठोर कायद्याच्या निषेधार्थ संपावर गेलेले ट्रक चालक कामावर परत येऊ लागले आहेत आणि एक-दोन दिवसांत स्थिती सुरळीत होईल, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या ट्रक व्यावसायिकांच्या संघटनेने बुधवारी स्पष्ट केले.

भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत हिट अँड रन केसेससाठी कडक तुरुंगवास आणि दंडाच्या तरतुदींचा निर्णय ट्रकचालकांशी सल्लामसलत करून घेतला जाईल, असे सरकारने आश्वासन दिल्यानंतर एआयएमटीसीने मंगळवारी आंदोलनकर्त्या ट्रक चालकांना संप संपविण्याचे आवाहन केले.

एआयएमटीसीच्या प्रतिनिधींनी मंगळवारी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन हिट अँड रन प्रकरणांसाठी कठोर तरतुदींचा मुद्दा उपस्थित केला होता. एआयएमटीसीचे सरचिटणीस एन के गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही कोणतीही संपाची हाक दिली नव्हती. संप करणारे चालक कामावर परत येत आहेत आणि एक-दोन दिवसांत कामकाज पूर्ववत होईल.

गुप्ता म्हणाले की, काही ठिकाणी ट्रक चालकांचा संप ही नवीन कायद्यांबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि चालकांनी आता काळजी करण्याची गरज नाही आणि त्यांनी कामात सहभागी होऊन अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावला पाहिजे. काही ट्रक, बस आणि टँकर चालकांनी या कठोर शिक्षेच्या तरतुदींच्या निषेधार्थ सोमवारी अनेक राज्यांमध्ये तीन दिवसीय संप सुरू केला होता.

logo
marathi.freepressjournal.in