
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या वेदनादायक स्मृती अद्यापही ताज्या असतानाच चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमो विषाणूचा (मेटान्यूमोव्हायरस- एचएमपीव्ही) उद्रेक झाला असून या नव्या विषाणूने भारतातही घुसखोरी केल्याचे सोमवारी उघड झाले. या विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण भारतात आढळले आहेत. गुजरातमध्ये एक, तर कर्नाटक व तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
कर्नाटकात एक तीन महिन्यांची मुलगी आणि दुसरा ८ महिन्यांच्या मुलाचा यात समावेश आहे, तर गुजरातमध्ये अहमदाबाद येथील एका दोन महिन्यांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तामिळनाडूमध्येही दोन मुलांना या विषाणूची बाधा झाल्याने देशवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भारतातील या विषाणूसंबंधी माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला असल्याची आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही पाच जणांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. या पाचही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.
भारतात एचएमव्हीपी संसर्ग हा बंगळुरूतील बॅप्टिस्ट रुग्णालयातील एका तीन महिन्यांच्या मुलीला आणि आठ महिन्यांच्या मुलाला झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर सध्या मुलीला घरी पाठविण्यात आले असून मुलावर उपचार केले जात आहेत आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गुजरातमध्ये दोन महिन्यांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमित तपासणीदरम्यान एचएमपीव्हीचे किमान दोन रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त देखरेख गट स्थापन केला होता. हा गट जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चीनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे. हिवाळ्याच्या दिवसात जगभरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनासंबंधित संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या घटना समोर येतात. असे असले तरी चीनच्या आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, संयुक्त देखरेख गट चीनमध्ये पसरत असलेल्या या आजारासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून सातत्याने अद्ययावत माहिती घेत आहे.
कोविड-१९ साथीच्या आजारासाठी कारणीभूत असलेला विषाणू आपल्यासाठी अज्ञात होता, पण एचएमपीव्ही हा आपल्याला माहिती असलेला विषाणू संसर्ग आहे. हा विषाणू श्वसनासंबंधीचे व्हायरल संक्रमण आहे. नेदरलँड्समधील २८ मुलांमध्ये एचएमपीव्ही २००१ मध्ये पहिल्यांदा आढळून आला होता. एचएमपीव्हीमध्ये सामान्य सर्दी आणि कोरोना विषाणूसारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर एचएमपीव्हीचा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे. त्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यासारखी खबरदारी घेण्याचे आवाहन अधिकारी जनतेला करीत आहेत.
एचएमपीव्ही हा ‘आरएनए’ विषाणू आहे, जो श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. ‘एचएमपीव्ही’ प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. चीनच्या ‘सीडीडी’ संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे की, एचएमपीव्हीचा संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो.
लहान मुले आणि वृद्ध लोक, तसेच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेले आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. विषाणूचा वाढता प्रभाव पाहता, अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याची शिफारस केली असून, काही नवे नियम जारी केले आहेत.
जनतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच - फडणवीस
एचएमपीव्ही विषाणूमुळे जनतेने घाबरण्याची गरज नाही. याबाबत जनतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा विषाणू नवीन नाही. आमचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. केंद्रीय आरोग्य खाते व राज्याचे आरोग्य खाते एकमेकांच्या संपर्कात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा नवीन विषाणू नाही - नड्डा
एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. त्यामुळे याला घाबरण्याची गरज नाही. सरकारचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केले. नड्डा पुढे म्हणाले की, आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. २००१ मध्ये पहिल्यांदा या विषाणूचा शोध लागला. अनेक वर्षांपासून तो जगात पसरला आहे. हा सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो.
चेन्नईत दोन मुलांना लागण
चेन्नईतील दोन मुलांनाही एचएमपीव्हीची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.