नवी दिल्ली : देशातील विमानांना बॉम्बचे धमकीसत्र सुरूच आहे. रविवारी २० हून अधिक विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या सहा-सहा विमानांचा त्यात समावेश आहे. तर शनिवारी ३० हून अधिक विमानांना धमकी मिळाली होती. त्यामुळे शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. गेल्या आठवड्यात ९० हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी मिळाली होती. या सर्वच अफवा ठरल्या.
भारतीय हवाई क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित
नागरी विमान उड्डाण सुरक्षा संस्थेचे महासंचालक झुल्फीकार हसन यांनी विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भारतीय हवाई क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास हसन यांनी यावेळी व्यक्त केला.
आठवड्यात २०० कोटींचे नुकसान
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळताच हे विमान जवळच्या विमानतळावर उतरवले जाते. विमानाची तपासणी केली जाते. तोपर्यंत प्रवाशांना हॉटेलमध्ये ठेवावे लागते. तसेच त्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करावी लागते. यासाठी ३ कोटी रुपये खर्च होतात. आतापर्यंत ७० हून अधिक धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे या धमक्यांमुळे २०० कोटींचे नुकसान झाले.
केंद्रीय गृह खात्याने अहवाल मागवला
केंद्रीय गृहखात्याने नागरी हवाई खाते, नागरी हवाई सुरक्षा विभागाकडून तपशीलवार अहवाल मागवला आहे. तसेच सीआयएसएफ, एनआयए आणि आयबी यांना अहवाल देण्याचे आदेश दिले.
'डीजीसीए' प्रमुखांना हटवले
गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने शनिवारी 'डीजीसीए' प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवले असून त्यांची कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.