गृहमंत्र्यांची शून्य दहशतवाद योजनेवर चर्चा;उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक आज

गेल्या वर्षी १३ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर अशाच प्रकारच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अमित शहा यांनी नेतृत्व केले होते.
गृहमंत्र्यांची शून्य दहशतवाद योजनेवर चर्चा;उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक आज

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी नवी दिल्लीत जम्मू आणि काश्मीरबाबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती, सुरक्षा ग्रीड आणि शून्य दहशतवाद योजना अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

गृहमंत्री या बैठकीत सुरक्षा ग्रीडचे कार्य आणि सुरक्षा तसेच केंद्रशासित प्रदेशातील विकास उपक्रमांशी संबंधित विविध कामांचा आढावा घेतील. तसेच एरिया डोमिनेशन प्लॅन, झिरो टेरर प्लॅन, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, यूएपीए आणि इतर सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा देखील अमित शहा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या बैठकीत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्य सचिव अटल दुल्लू आणि पोलीस महासंचालक आर. आर. स्वेन उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महासंचालक, तसेच गृह मंत्रालय आणि जम्मूचे संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

गेल्या वर्षी १३ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर अशाच प्रकारच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अमित शहा यांनी नेतृत्व केले होते. यावेळी सरकारच्या नेतृत्वाखालील दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेच्या धोरणानुसार, सर्व सुरक्षा यंत्रणा सामना करण्याच्या दिशेने काम करत असल्याचे अमित शहा म्हणाले. दहशतवाद्यांचे समर्थन आणि माहितीचे जाळे नष्ट करण्यासाठी ३६० डिग्री सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in