कोलकाता : जगविख्यात ऑस्कर पुरस्कारासाठी (ॲकॅडमी ॲवॉर्डसाठी) आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात भारतातर्फे ‘होमबाऊंड’ हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष एन. चंद्रा यांनी शुक्रवारी दिली.
कोलकातात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रा म्हणाले की, देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगवेगळ्या भाषांतील एकूण २४ चित्रपटांची स्पर्धा होती. हा निर्णय घेणे खूप कठीण होते. हे असे चित्रपट होते ज्यांनी लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला होता, असे ते म्हणाले.
नीरज घायवान दिग्दर्शित आणि करण जोहर व आदर पूनावाला निर्मित ‘होमबाऊंड’ या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संपादक आणि पत्रकार अशा १२ सदस्यीय समितीने ही निवड केली. आम्ही परीक्षक नव्हतो, तर प्रशिक्षक होतो. आम्ही अशा खेळाडूंचा शोध घेत होतो ज्यांनी आपली छाप सोडली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हा चित्रपट उत्तर भारतातील एका छोट्या गावातील दोन बालमित्रांची कथा सांगतो. जे पोलीस खात्यातील नोकरीच्या मागे धावतात. हीच नोकरी त्यांना खूप दिवसांपासून नाकारलेले सन्मान परत मिळवून देईल, अशी आशा त्यांना असते.