स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ ; युद्धनौकेचे मुंबईत शक्तीप्रदर्शन

दै. ‘नवशक्ति’शी बोलताना ‘विक्रांत’चे कमांडिंग ऑफिसर विद्याधर हर्के म्हणाले की, या विमानवाहू युद्धनौकेमुळे ५०० छोट्या कंपन्यांना व अनेक उद्योगांना चालना मिळाली
स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ ; युद्धनौकेचे मुंबईत शक्तीप्रदर्शन

भारत आतापर्यंत विमानवाहू युद्धनौकांसाठी बलाढ्य देशांवर अवलंबून होता. परदेशातून जुन्या झालेल्या युद्धनौकांचे आधुनिकीकरण करून त्या वापरल्या जात होत्या. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. भारताने स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका तयार केली. मुंबई दौऱ्यावर आलेल्या या युद्धनौकेने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवत नौदल संरक्षणसज्ज असल्याचे दाखवून दिले.

या युद्धनौकेवर मिग-२९ के, एमएच-६० रोमियो हेलिकॉप्टर, कमोव्ह केए-३१ हेलिकॉप्टर, हलक्या वजनाची विमाने, हलक्या वजनाची हेलिकॉप्टर तैनात केली आहे. या युद्धनौकेला गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲॅन्थोनी अल्बानीस यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली.

दै. ‘नवशक्ति’शी बोलताना ‘विक्रांत’चे कमांडिंग ऑफिसर विद्याधर हर्के म्हणाले की, या विमानवाहू युद्धनौकेमुळे ५०० छोट्या कंपन्यांना व अनेक उद्योगांना चालना मिळाली. नौदलाच्या जहाजांची बांधणी देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. देशात यांची बांधणी झाल्यास भारताच्या आर्थिक व तंत्रज्ञानाला चालना मिळते. विक्रांतसाठी अनेक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. याचा वापर नागरी वापरासाठी होणार आहे. युद्धनौकेसाठी तयार केलेली केबल्स व स्टील आदींचा वापर अन्य पायाभूत विकासासाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले.

नौदल आर्किटेक्ट व नौदल युद्धनौका ब्युरोने या आधुनिक विमानवाहू युद्धनौकेचे डिझाइन तयार केले. १९६० पासून भारत छोट्या छोट्या बोटींचे डिझाइन करत आहे. भारताने गोदावरी, दिल्लीच्या श्रेणीच्या युद्धनौका बनवल्या आहेत. आता विशाखापट्टणम, मार्मागोवा येथे युद्धनौकेचे डिझाइन व बांधणी केली जात आहे. तसेच भारतात पाणबुड्या, विमानवाहू युद्धनौका बांधली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

नौदलाच्या प. विभागाचे मुख्यालय मुंबईत आहे. स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आली आहे.

युद्धनौकेची वैशिष्ट्ये

ही युद्धनौका २६२ मीटर लांब असून, तिचे वजन ४५ हजार टन आहे. युद्धनौकेचा डेक दोन फुटबॉल मैदानाइतकी मोठा असून, विमान ठेवण्याचे हँगर्स दोन ऑलिम्पिक पुलाइतके मोठे आहेत. युद्धनौकेवर २२०० कम्पार्टमेंट असून, १६०० सैनिक त्यावर राहू शकतात. भारताकडे यापूर्वीही विक्रांत युद्धनौका होती. १९४५ मध्ये ब्रिटिश युद्धनौका एचएमएस हर्क्युलस सेवेत आली. १९६१ मध्ये भारताने तिला खरेदी केली. तिचे नामकरण ‘विक्रांत’ केले. १९९७ मध्ये ती निवृत्त झाली. आता नवीन भारतीय बनावटीची ‘विक्रांत’ही सप्टेंबर २०२२ मध्ये सेवेत आली.

नौदलाला हवी नवीन विमाने

भारतीय नौदलाला ‘मिग-२९ के’ लढाऊ विमाने बदलायची आहेत. त्याऐवजी नवीन लढाऊ विमाने हवी आहेत. बोइंगचे ‘एफ/ए-१८’ सुपर हॉर्नेट व डसॉस्टचे राफेल मरीन ही विमाने नौदलाला आपल्या ताफ्यात हवी आहेत.

विमानवाहू युद्धनौका बनवणाऱ्या देशांच्या यादीत भारत

विक्रांतमुळे विमानवाहू युद्धनौका बनवणाऱ्या नामवंत देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. यातून भारताचे तंत्रज्ञान व अभियांत्रिकी कौशल्य जगासमोर आले. या युद्धनौकाचा सर्वाधिक वेग ताशी २८ सागरी मैल आहे, तर नेहमी ती १८ सागरी मैल वेगाने प्रवास करेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in