नेव्हल डॉकमध्ये हनीट्रॅप! पाकिस्तानी गुप्तचरांना माहिती पुरवल्याबद्दल प्रशिक्षणार्थ्याला अटक

मे महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. मुक्ता महातो, पायल एंजल आणि आरती शर्मा या कथित व्यक्तींना त्याने व्हॉट्सअॅपद्वारे ही माहिती दिली
नेव्हल डॉकमध्ये हनीट्रॅप! पाकिस्तानी गुप्तचरांना माहिती पुरवल्याबद्दल प्रशिक्षणार्थ्याला अटक
PM

मुंबई : नेव्हल डॉकयार्डमध्ये हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तानी गुप्तहेरांना नौदलाची माहिती पुरवल्याबद्दल महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) प्रशिक्षणार्थी गौरव अर्जुन पाटील याला अटक केली आहे. गौरवने पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला (पीआयओ) ९०० चॅट पाठवल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. या चॅटमध्ये त्याने संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेरांना पुरवली असून त्यात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

गौरव पाटील हा फेसबुकवर पायल अँजल नावाने अकाउंट असलेल्या पाकिस्तानी गुप्तहेरांना माहिती पुरवत होता. गौरवने आपण नेव्हल शिपयार्डमध्ये कर्मचारी असल्याची माहिती फेसबुकवर अपलोड केल्याने पीआयओच्या एजंटने या माहितीची योग्य पडताळणी केली होती. त्यानंतर त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्यात आले. पीआयओ एजंटने आपल्याला नौदल, जहाजे आणि युद्धनौकांमध्ये अतिशय आवड असल्याचे त्याला सांगितले होते. पायल एंजलशी केलेल्या संभाषणामध्ये त्याने नेव्हल डॉकयार्डच्या जेट्टीवर असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांबाबतची माहिती गौरवने दिली होती. पायलने तपासासाठी याच युद्धनौका आणि पाणबुड्यांची छायाचित्रे शेअर करत त्याच्याकडून या युद्धनौका आणि पाणबुड्या किती कालावधीसाठी डॉकयार्डमध्ये थांबणार आहेत, याबाबत चौकशी केली होती.

त्याचबरोबर गौरवला आरती शर्मा नावाच्या आणखीन पीआयओ एजंटने हनीट्रॅपमध्ये अडकवले होते. तिने आपण दुबईस्थित असल्याचे सांगत त्याच्याशी आधी फेसबुकद्वारे संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांच्यात व्हॉट्सॲॅपवरून संभाषण सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, गौरव या दोघींशी डेटिंग करत होता तसेच लवकरत त्यांच्या भेटीची अपेक्षा बाळगून होता, पण त्याला या दोघी पीआयओ एजंट असल्याचे माहित नव्हते.

या दोघींनी त्याला काही शस्त्रास्त्रांची छायाचित्रे पाठवली होती. ही शस्त्रास्त्रे किंवा उपकरणे या पाणबुड्या किंवा युद्धनौकांमध्ये बसवण्यात आली आहेत की नाही, याची माहिती मागितली होती. यासोबत त्यांनी त्यांना आवश्यक असलेली त्यांची विशिष्ट माहिती समजण्यास मदत करण्यासाठी स्पष्टीकरण मागितले होते. जेट्टीवर पार्क असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती मागवण्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्या नौकांमध्ये आधुनिक उपकरणे बसवण्यात येणार आहेत तसेच त्यांची चाचणी कधी सुरू होणार आहे, याची माहिती समजावून घेणे हे होते. योगायोगाची बाब म्हणजे, गौरवने सध्या दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या आणि अन्य कामे सुरू असलेल्या युद्धनौकांची छायाचित्रे या दोन्ही एजंटना पाठवली होती.

मे महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. मुक्ता महातो, पायल एंजल आणि आरती शर्मा या कथित व्यक्तींना त्याने व्हॉट्सअॅपद्वारे ही माहिती दिली. पायल आणि आरती या दोन एजंटनी त्याच्याशी गोडगोड बोलून ही माहिती काढून घेतली होती. त्याचबरोबर गौरव आपल्याशी खोटे तर बोलत नाही, याची वारंवार काळजी या एजंटकडून घेतली जात होती. पायल एंजल ज्याविषयी माहिती विचारत असे, तीच माहिती आरती शर्मा काही दिवसांनी त्याला विचारत असे. गौरवने दिलेली माहिती बरोबर आहे की नाही, हे क्रॉस चेक केले जात होते.

मे महिन्यापासून पैशांसाठी कृत्य

गौरव हा नेव्हल डॉकयार्डमध्ये नोव्हेंबर २०२२ पासून प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाला होता. पायल एंजल आणि आरती शर्मा यांच्याशी त्याने मे ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संभाषण केले होते. वैयक्तिक खर्चासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितल्यामुळे त्याला फक्त २ हजार रुपये प्राप्त झाले होते. पश्चिम बंगालच्या मुक्ता महातो नावाच्या व्यक्तीच्या जी-पे अकाऊंटवरून त्याला हे पैसे प्राप्त झाले होते. बोगस कागदपत्रांद्वारे हे अकाऊंट ओपन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

 महत्त्वाची माहिती जप्त

पीआयओ एजंटच्या हनीट्रॅप प्रकरणात तो प्राथमिक अवस्थेत होता. एटीएसने त्याच्या मोबाईल फोनकडून काही छायाचित्रे तसेच विविध युद्धनौका, टायगर गेट, लायन गेट आणि अन्य वर्कस्टेशन्सची छायाचित्रे जप्त केली आहेत. त्याचबरोबर सध्या दुरुस्ती सुरू असलेल्या युद्धनौकांची माहिती त्याच्या मोबाईलमध्ये सापडली आहे. त्याचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करण्यात येत आहे. त्याच्याद्वारे त्याचे कोणते म्युच्युअल फ्रेंडस या पीआयओ एजंट्सच्या संपर्कात होते, याचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in