
नवी दिल्ली : २५० रुपये किलो टोमॅटो... भाज्यांनी किलोमागे गाठलेली शंभरी यामुळे भारतात शाकाहारी थाळी जूनच्या तुलनेत जुलैमध्ये तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण्यास जाणे आता अधिक महाग झाले आहे. क्रिसील या पतमान संस्थेने अन्नाच्या थाळीच्या किमतीचे दरपत्रक जारी केले आहे. त्यात ही माहिती दिली.
टोमॅटोचे दर वाढल्याने शाकाहारी थाळी २५ टक्क्यांनी महाग झाली आहे. जूनमध्ये टोमॅटो ३३ रुपये किलो होता. तो २३३ टक्क्यांनी वाढून ११० रुपये प्रति किलो झाला. यंदा सलग तिसऱ्या महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत वाढली आहे. मांसाहारी थाळीचे दरही १३ टक्क्यांनी वाढले आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम भारतातील अन्नपदार्थांच्या किमतीवर आधारित थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च तयार करण्यात आला. त्यानुसार महिन्याचा खर्च वाढल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या खर्चावर मोठा परिणाम होत आहे. अन्नधान्य, चिकन, भाज्या, मसाले, खाद्यतेल, गॅस आदींवर थाळीची किंमत अवलंबून असते. शाकाहारी थाळीत चपाती, भाज्या, तांदूळ, डाळ, दही व सलाड आदींचा समावेश असतो. मांसाहारी थाळीत आता डाळीच्या ऐवजी चिकनचा समावेश केला आहे.
कांदा-बटाट्याच्या दरामुळे थाळीची किंमत वाढली
कांदा-बटाट्याच्या किमती महिन्यात १६ ते ९ टक्क्याने वाढल्या आहेत. त्यामुळे शाकाहारी थाळीचे दर वाढले आहेत. मिरची व जिऱ्याच्या किमती अनुक्रमे ६९ टक्के व १६ टक्क्यांनी वाढले. शाकाहारी थाळीच्या तुलनेत मांसाहारी थाळीचे दर संथगतीने वाढले आहेत. ब्रॉयलर्स चिकनच्या किमती जुलैमध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घटल्या आहेत.