
अयोध्या : प्रभू रामाची नगरी अयोध्या सध्या चर्चेत आहे. २२ जानेवारीला नव्याने बांधलेल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी २२ ते २३ जानेवारीदरम्यान अयोध्येत हॉटेल्स बुकिंग सुरू झाली आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीचे हॉटेल्सचे रात्रीचे भाडे ७० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच विमान वाहतूक क्षेत्रही अयोध्येवर लक्ष ठेवून आहे. इंडिगो आणि एअर इंडियासारख्या विमान कंपन्या त्यांची थेट उड्डाणे सुरू करणार आहेत.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्घाटन दिवशी देशभरातून सुमारे ३ ते ५ लाख भाविक अयोध्येला पोहोचतील. हा आकडा आणखी जास्त असू शकतो. या कार्यक्रमासाठी अयोध्येतील बहुतांश हॉटेल्स आधीच बुक झाले आहेत. ज्या हॉटेलमध्ये या तारखांना खोल्या उपलब्ध आहेत, त्यांचे भाडे गगनाला भिडले आहेत. आगामी काळात अयोध्येत हॉटेल व्यवसायात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन रॅडिसन ब्लू आणि ताज हॉटेल्स या साखळी कंपन्याही तिथे आपले हॉटेल्स बांधण्याचा विचार करत आहेत.
२२ जानेवारीला श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यादिवशी हॉटेल्सचे एका दिवसाचे भाडे हे ७० हजार रुपये आहे. जेव्हा तुम्ही २२ जानेवारीला हॉटेल बुक करण्यासाठी ऑनलाईन हॉटेल बुकिंग साइटवर लॉगइन करता तेव्हा अयोध्येजवळ फैजाबादमधील सिग्नेट कलेक्शन हॉटेलमध्ये एका खोलीचे भाडे ७०,२४० रुपये दाखवले जात आहे, तर रामायण हॉटेलमध्ये एक रूम सुमारे ४० हजार रुपये प्रतिदिन भाड्याने उपलब्ध आहे.