मणिपूरमध्ये आणखी चार आमदारांची घरे पेटविली; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न

वांशिक संघर्षामुळे जवळपास दोन वर्षांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही हिंसाचाराचा उद्रेक झाला. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला.
मणिपूरमध्ये आणखी चार आमदारांची घरे पेटविली; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न
पीटीआय
Published on

इम्फाळ : वांशिक संघर्षामुळे जवळपास दोन वर्षांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही हिंसाचाराचा उद्रेक झाला. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. त्यानंतर जमावाने इम्फाळ खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एका ज्येष्ठ मंत्र्यांच्या निवासस्थानासह भाजपच्या आणखी तीन आमदारांच्या आणि काँग्रेसच्या आमदारांच्या निवासस्थानांना आगी लावल्या.

जिरिबाम जिल्ह्यात बंडखोरांनी तीन महिला आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर संचारबंदी जारी असतानाही शनिवारी रात्री हिंसाचार उफाळला. जमावाने रविवारी इम्फाळ पूर्व जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंददास कोंथोजौम, भाजप आमदार वाय. राधेश्याम, पानोनाम ब्रोजेम आणि काँग्रेसचे आमदार लोकेश्वर यांच्या घरांना आगी लावल्या. संतप्त जमाव निवासस्थानांमध्ये घुसला, तेव्हा आमदार अथवा त्यांचे कुटुंबीय तेथे नव्हते. त्यानंतर जमावाने तेथील मालमत्तेची तोडफोड केली आणि घरांना आगी लावल्या. त्यामध्ये घरे काही प्रमाणात जळाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचे वृत्त कळताच अग्निशामक दल तातडीने तेथे रवाना झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

अश्रुधुराचा वापर, इंटरनेट सेवा बंद

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याच्या हेतूने आलेल्या जमावाला पांगविण्यासाठी आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल आणि राज्य दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी गोळ्यांचा माराही केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टायर जाळण्यात आले आणि लोखंडी सळ्या ठेवून निदर्शकांनी रस्ता अडविला. रविवारी स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, अन्य मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ला करण्यात येत असल्याचे प्रकार घडल्याने खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.

हिंसाचाराला भाजप कारणीभूत - खर्गे

तिरस्कार आणि फुटीरतावादी राजकीय हेतू साध्य होत असल्याने भाजप जाणूनबुजून मणिपूर पेटत ठेवत असल्याचा आरोप रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. मणिपूर दोन वर्षांपासून पेटत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे फिरकलेही नाहीत, याबद्दल राज्य त्यांना कधीही मफ करणार नाही. जनता ही बाब कधीही विसरणारही नाही, असे खर्गे यांनी म्हटले आहे. मोदी तुमच्या डबल इंजिन सरकारमुळे मणिपूर सुरक्षित राहिलेले नाही. भाजप हे राज्य जाणूनबुजून पेटत ठेवत असल्याचा आरोप आम्ही जबाबदारीने करीत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमित शहांच्या सर्व प्रचारसभा रद्द

मणिपूरमधील स्थिती अधिकच चिघळल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपले महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केले आणि ते पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते तातडीची बैठक घेण्याची शक्यता आहे.

‘एनपीपी’ने भाजप सरकारचा पाठिंबा काढला

‘नॅशनल पीपल्स पार्टी’ने (एनपीपी) मणिपूरमध्ये एन. बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मात्र, भाजपकडे ३२ आमदार असून स्पष्ट बहुमत असल्याने सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही. कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील ‘एनपीपी’ने राज्यातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे. एनपीपीचे मणिपूर विधानसभेत सात आमदार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in