

नवी दिल्ली : हिंदुस्थान युनिलिव्हरने (एचयूएल) वाढत्या उत्पादन खर्चाचा दबाव आणि नफा (मार्जिन) टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या होम केअर पोर्टफोलिओमधील सर्फ एक्सेल, रिन आणि व्हील यांसारख्या लोकप्रिय डिटर्जंट बँड्ससह अनेक उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतीत ११ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
गेल्या महिन्यात कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया नायर यांनी सांगितले होते की, मागणी कायम असली तरी कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीतील बदलानुसार हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ करत राहील.
किमतींमधील हा बदल विविध आकारांच्या पॅक्ससाठी लागू असून, १ ते १० रुपयांपर्यंत ही वाढ करण्यात आली आहे. कंपनीने 'सर्फ एक्सेल क्विक वॉश'च्या (१ किलो पॅक) एमआरपीमध्ये १० रुपयांची वाढ केली असून, ती आता २३५ रुपयांवरून २४५ रुपये झाली आहे. याच्या ५०० ग्रॅमपॅकची किंमत ५ रुपयांनी वाढून १२३ रुपयांवरून १२८ रुपये झाली आहे.
'सर्फ एक्सेल इझी वॉश'च्या (१ किलो पॅक) किमतीत ५ रुपयांची वाढ करण्यात आली असून, ती १६७ वरून १७२ रुपये झाली आहे. तर ५०० ग्रॅम पॅकची किंमत आता ८५ वरून ८७ रुपये झाली आहे. 'सर्फ एक्सेल बार'च्या (२५० ग्रॅम) एमआरपीमध्ये ३ रुपयांची वाढ होऊन तो ४५ रुपयांचा झाला आहे. तर चार बारच्या बंडलची किंमत १० रुपयांनी वाढून १५५ रुपये झाली आहे.
एचयूएलने 'रिन' आणि 'व्हील' उत्पादनांच्या किमतीही वाढवल्या आहेत. 'रिन आला' ५०० मिली ची किंमत ५ रुपयांनी वाढून ९५ रुपये झाली आहे. रिन डिटर्जंट पावडरचे १ किलो आणि ५०० ग्रॅमचे पॅक अनुक्रमे ३ रुपये आणि २ रुपयांनी महागले असून त्यांची किंमत आता अनुक्रमे १२३ रुपये आणि ६३ रुपये झाली आहे.
कंपनीने 'व्हील' डिटर्जंट पावडरच्या (१ किलो) किमतीत ३ रुपयांची वाढ केली असून ती आता ९३ रुपये झाली आहे. तसेच ५०० ग्रॅमच्या पॅकची किंमत ४६ रुपयांवरून ४७ रुपये झाली आहे.
सर्फ एक्सेल :
क्विक वॉश (१ किलो) : १० रुपयांनी वाढून २४५ रुपये
क्विक वॉश (५०० ग्रॅम) : ५ रुपयांनी वाढून १२८ रुपये
इझी वॉश (१ किलो) : ५ रुपयांनी वाढून १७२ रुपये
इझी वॉश (५०० ग्रॅम) : २ रुपयांनी वाढून ८७ रुपये
सर्फ एक्सेल बार (२५० ग्रॅम) : ३ रुपयांनी वाढून ४५ रुपये
४-बार बंडल (प्रत्येकी २०० ग्रॅम) : १० रुपयांनी वाढून १५५ रुपये
रिन आणि व्हील :
रिन आला ५०० मिली : ५ रुपयांनी वाढून ९५ रुपये
रिन डिटर्जंट पावडर (१ किलो) : ३ रुपयांनी वाढून १२३ रुपये
रिन डिटर्जंट पावडर (५०० ग्रॅम) : २ रुपयांनी वाढून ६३ रुपये
व्हील डिटर्जंट पावडर (१ किलो) : ३ रुपयांनी वाढून ९३ रुपये
व्हील डिटर्जंट पावडर (५०० ग्रॅम) : १ रुपयाने वाढून ४७ रुपये