पार्किंगच्या वादातून अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या; CCTV फूटेज आले समोर; दोघांना अटक

शहरांमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली असून पार्किंगच्या जागेवरून वाद झाल्याच्या बातम्या आता नेहमीच्या झाल्या आहेत. मात्र, आता पार्किंगचा वाद विकोपाला गेल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पार्किंगच्या वादातून अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या; CCTV फूटेज आले समोर; दोघांना अटक
Published on

शहरांमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली असून पार्किंगच्या जागेवरून वाद झाल्याच्या बातम्या आता नेहमीच्या झाल्या आहेत. मात्र, आता देशाची राजधानी दिल्लीमध्ये पार्किंगचा वाद विकोपाला गेल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात घराबाहेरील पार्किंगवरून झालेल्या वादातून हुमाचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची (वय-४२) हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जंगपुराच्या भोगल बाजार लेनमध्ये ही घटना घडली. आसिफने दोन व्यक्तींना त्यांची स्कूटर त्याच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर पार्क करण्यास सांगितले. त्यामुळे शाब्दिक बाचाबाची झाली आणि परत येण्याची धमकी देऊन ते दोघे तिथून निघून गेले.

पतीला मारण्याचा आधीही केला होता प्रयत्न

"रात्री ९:३०-१० च्या सुमारास, एका शेजाऱ्याने आमच्या घराबाहेर स्कूटर पार्क केली होती," असे असिफ कुरेशीची पत्नी शाहीन आसिफ कुरेशीने सांगितले. "माझ्या पतीने त्याला गाडी बाजूला पार्क करण्याची विनंती केली. पण, त्या माणसाने आसिफला शिवीगाळ केली आणि परत येण्याची धमकी दिली. काही मिनिटांतच तो माणूस त्याच्या भावासोबत आला आणि त्याने आसिफवर धारदार शस्त्राने वार केले. मी माझा मेहुणा जावेद याला फोन केला पण तो पोहोचेपर्यंत आसिफचे खूप रक्त वाहून गेले होते आणि तो मरण पावला होता," असे शाहीन पुढे म्हणाली. आसिफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यापूर्वीही पार्किंगच्या वादावरून त्यांचं माझ्या पतीसोबत भांडण झालं होतं. आरोपीने यापूर्वीही पतीला मारण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही शाहीन यांनी केला आहे.

हुमाच्या वडिलांनी सांगितली घटना

हुमा कुरेशीचे वडील सलीम कुरेशी यांनी त्यांच्या पुतण्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. "दोन जणांनी घरासमोर एक स्कूटर पार्क केली होती. आसिफने त्यांना स्कूटर घराच्या प्रवेशद्वारासमोर लावू नका असे सांगितले आणि बाजूला लावण्याची सूचना केली. ते (आरोपी) दोघे जण होते, त्यांनी मिळून माझ्या पुतण्याची हत्या केली," असे ते म्हणाले.

आरोपी भावांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी उज्ज्वल (१९) आणि गौतम (१८) या दोन आरोपींना अटक केली आहे. ४२ वर्षीय आसिफ कुरेशी हा चिकन व्यवसाय करत होता. आसीफच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला असून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे.

logo
marathi.freepressjournal.in