
नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील घटनेने डोंगराळ भागातील भूस्खलनाचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. तसेच, अशा घटनांना मानवाचा पर्यावरणातील अतिरिक्त हस्तक्षेप आणि तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे सातत्याने केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सत्यही नव्याने अधोरेखित झाले आहे.
पश्चिम घाटांच्या प्रदेशात बेसुमार जंगलतोड होत आहे. जंगलांमध्ये वणवे लागण्याच्या किंवा जाणूनबुजून लावले जाण्याच्या घटनाही वाढत आहे. खाणकामाचा विस्तार वाढत आहे. बांधकामाच्या दगडांसाठी संपूर्ण डोंगर अक्षरश: पोखरून सपाट केले जात आहेत. पर्यटनाच्या नावाखाली डोंगरउतारांवर मोठी बांधकामे केली जात आहेत. भूजलाचा अनिर्बंध उपसा केला जात आहे. या सर्व मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणाची न भरून येणारी हानी होत असून, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अनेक पर्यावरण तज्ज्ञ सातत्याने देत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातूनच इर्शाळवाडीसारख्या आपत्ती ओढवत आहेत, असे माधव गाडगीळ यांच्यासारख्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
या अनुषंगाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गतवर्षी देशाचा भूस्खलन नकाशा (लँडस्लाइड अॅटलास) जारी केला होता. त्यात देशभरातील भूस्खलनप्रवण क्षेत्रे, त्यांची कारणे, परिणाम, आकडेवारी आदी बाबी नमूद केल्या होत्या. तसेच देशातील भूस्खलनदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांची (लँडस्लाइड हॉटस्पॉट्स) यादीही प्रसिद्ध केली होती. हा अहवाल बनवण्यासाठी इस्रोच्या हैदराबादस्थित नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने (एनआरएससी) १९९८ ते २०२२ दरम्यान संकलित केलेल्या भूस्खलनविषयक माहितीचा वापर केला होता. तसेच कृत्रिम उपग्रहांमार्फत घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्रांचाही अभ्यास केला होता.
त्यानुसार भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा भूस्खलनप्रवण देश आहे. भारतात दरवर्षी प्रत्येक १०० चौरस किलोमीटर क्षेत्रात किमान एका व्यक्तीचा मृत्यू भूस्खलनामुळे होतो. भारतात २०२२ साली अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे ८३५ जणांचा मृत्यू झाला. जमिनीतील खडक आणि मातीचे स्वरूप, भ्रंशरेषा, भूकंप, पाऊस आदी भूस्खलनाची नैसर्गिक कारणे आहेत. त्याशिवाय खाणकाम, खोदकाम, डोंगरांचे कडे कापणे, विकासाच्या नावाखाली डोंगरउतारांवर बांधकामे करणे, जंगलतोड, जंगलांना आगी लावणे आदी मानवी कारणेही भूस्खलनाला जबाबदार आहेत, असे या अहवालात म्हटले होते.
देशात होणाऱ्या एकूण भूस्खलनाच्या घटनांपैकी ६६.५ टक्के घटना हिमालयाच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागांत घडल्या आहेत. हिमालयाच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागात १८.८ टक्के घटना घडल्या, तर पश्चिम घाटामध्ये १४.७ टक्के भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. देशाच्या पश्चिम घाटात समाविष्ट होणाऱ्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतील ०.०९ दशलक्ष चौरस किमी क्षेत्र भूस्खलनप्रवण आहे.
देशभरात १९९८ ते २०२२ या काळात भूस्खलनाच्या ८०,९३३ घटना घडल्या. त्यातील सर्वाधिक १२,३८५ घटना मिझोराममध्ये, तर त्याखोलोखाल ११,२२९ घटना उत्तराखंडमध्ये झाल्या. भूस्खलनाच्या घटनांबाबत देशभरात महाराष्ट्राचा आठवा क्रमांक लागला. अभ्यासाच्या या कालावधीत महाराष्ट्रात भूस्खलनाच्या ५,११२ घटना घडल्या. देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत पश्चिम घाटातील भूस्खलनात मानवी जीवितहानीचे प्रमाण जास्त आहे.